शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गावरील स्थानकांचे काम प्रगतीपथावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 09:23 IST2024-12-17T09:21:36+5:302024-12-17T09:23:14+5:30
मेट्रो मार्गाचे काम पूर्णत्वाकडे : एकूण २३ स्थानके असतील

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गावरील स्थानकांचे काम प्रगतीपथावर
पुणे : शिवाजीनगर-हिंजवडी या शहरातील तिसऱ्या मेट्रो मार्गावरील स्थानकांचे काम प्रगतीपथावर आहे. एकूण २३ किलोमीटर अंतराचे मेट्रो मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. आता स्थानकांच्या कामाला सुरुवात झाली आहे. या मेट्रोमुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांचा रस्ते मार्गाने होणारा खडतर प्रवास थांबणार आहे. त्याच बरोबर मेट्रोमुळे सातत्याने होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.
सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) या मेट्रो मार्गाचे काम होत आहे. टाटा समूह अशा प्रकारच्या कामांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र कंपनीने हे काम घेतले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर सलग ३५ वर्षे या मेट्रोचे संचालन त्यांच्याकडेच राहणार आहे. यातून सार्वजनिक प्रवासी सेवेसाठी लागणारा वेळ वाचणार, स्वस्त व आरामदायी पर्याय मिळणार आहे. शिवाजीनगरपासून थेट हिंजवडीपर्यंत जाणाऱ्या या मार्गात एकूण २३ स्थानके असतील. ती सर्व स्थानके उन्नत म्हणजे रस्त्यापासून साधारण २७ ते २८ मीटर उंचीवर असतील. या स्थानकांच्या कामांना कंपनीने आता वेगात सुरुवात केली आहे.
पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) नियंत्रणाखाली हे काम सुरू आहे. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड ही विशेष कंपनी (एसपीव्ही- स्पेशल पर्पज व्हेईकल) यासाठी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून मेट्रो मार्गाच्या संपूर्ण कामाचे संचालन केले जात आहे. पुढील वर्षी (२०२५) प्रकल्प पूर्ण होऊन सर्वसामान्यांच्या सेवेत रुजू होईल, अशी पीएमआरडीएच्या वतीने सांगण्यात आली आहे.