पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमधून प्रवास करताना टवाळखोरांकडून महिला, विद्यार्थिनींना कोणी त्रास दिल्यास बस थेट जवळच्या पोलिस ठाण्यात घेऊन जा. त्या टवाळखोरांबाबत तक्रार दाखल करा. त्याची माहिती पीएमपीच्या अपघात विभागाला कळवा, तसेच पोलिस नियंत्रण कक्षाला कळवा, अशा सूचना पीएमपी प्रशासनाने सर्व वाहक व चालकांना दिल्या आहेत.
स्वारगेट बस स्थानकावर महिला प्रवाशांसोबत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने बस, डेपोमध्ये महिला सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. महिला प्रवाशांना अधिक सुरक्षित वाटावे, त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी पीएमपीच्या वाहतूक विभागाने विविध निर्णय घेतले आहेत. यामध्ये सर्व चालक, वाहक, गॅरेज सुपरवायझर, टाइमकीपर आणि आगार व्यवस्थापकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
अशा आहेत सूचना
- बस प्रवासादरम्यान महिलांना त्रास देत असल्याचा प्रकार आढळून आल्यास चालक आणि वाहकांनी तातडीने पोलिस ठाण्यात बस घेऊन जावी. पोलिसांकडे तक्रार नोंदवावी.- बसमध्ये महिला प्रवाशाला त्रास देत असल्यास तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला कळवावे.- सर्व आगार व्यवस्थापकांनी आगारामध्ये व अखत्यारितील बस स्थानकावर महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.- आगारातील स्वमालकीच्या व ठेकेदारांच्या बसमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत आहेत का नाही, याची पाहणी करावी.- बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा करावा.- रात्री डेपो अथवा रस्त्यावर बस पार्किंग केल्यानंतर चालकांनी बसचा हँड ब्रेक लावावा. दरवाजे आणि खिडक्या बंद केल्याची खात्री करावी.- गॅरेज सुपरवायझर आणि सुरक्षारक्षकांनी डेपोत व रस्त्यावर पार्किंग केलेल्या बसची वेळोवेळी पाहणी करावी.- महिला प्रवाशांच्या तक्रारी महामंडळाकडे आल्यास संबंधित चालक-वाहकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
पीएमपीच्या प्रवासात कोणत्याही अघटित घटना घडू नये. यासाठी खबरदारी घेतली जाईल. शिवाय महिला सुरक्षेच्या दृष्टीने सर्व चालक, आगार व्यवस्थापकांना काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. - सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी