मुस्लिम असल्याने अमेरिकन महिलेची डॉक्टर महिलेला शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 13:49 IST2019-09-02T13:43:52+5:302019-09-02T13:49:13+5:30
भारतात अनेक ठिकाणी मुस्लिम असल्याच्या कारणावरुन हल्ल्याच्या घटना घडल्याचे आढळून आले आहे.

मुस्लिम असल्याने अमेरिकन महिलेची डॉक्टर महिलेला शिवीगाळ
पुणे - भारतात अनेक ठिकाणी मुस्लिम असल्याच्या कारणावरुन हल्ल्याच्या घटना घडल्याचे आढळून आले आहे. केवळ मुस्लिम असल्याचे समजल्यावर एका अमेरिकन महिलेने डॉक्टर असलेल्या महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. कॅम्पमधील क्लोअर सेंटरमध्ये रविवारी दुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी एका अमेरिकन महिलेवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
याप्रकरणी एका २२ वर्षाच्या डॉक्टर महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरुन लुईस जॅमी लायन या अमेरिकन महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी दुपारी क्लोअर सेंटरमध्ये गेल्या असताना त्या जिन्यावरुन खाली येत होत्या. त्यावेळी एका महिलेने त्यांना इंग्रजीत विचारले की तुम्ही मुस्लिम आहात का? त्यावर त्यांनी हो असे उत्तर दिले. त्यांचे उत्तर ऐकल्यावर ही अमेरिकन महिला खवळली व तिने शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. तसेच लाथ मारली. अचानक घडलेल्या या प्रकाराने या डॉक्टर महिला गडबडून गेल्या. त्यानंतर त्यांनी लष्कर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी या अमेरिकन महिलेला पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली व तिला ताकीद दिली आहे.