पुण्यात नदीपात्रातील पाण्यात अडकलेल्या महिलेची सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 21:45 IST2021-10-07T21:44:30+5:302021-10-07T21:45:05+5:30
महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा. त्यानंतर ती पाण्यात अडकली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुण्यात नदीपात्रातील पाण्यात अडकलेल्या महिलेची सुखरूप सुटका
पुणे: बंडगार्डन येथील नवी पुलाजवळ नदीपात्रातील पाण्यात अडकलेल्या एका ५५ वर्षांच्या महिलेची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. त्यानंतर संबंधित महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा. त्यानंतर ती पाण्यात अडकली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बंडगार्डन येथील नवीन पुलाजवळील नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह वाहत आल्याची खबर गुरुवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, एक महिला खडकाच्या आधाराने नदीच्या पाण्यात थांबली असल्याचे दिसून आले. महिलेच्या तोंडाला थोडा मार लागला होता.
त्यामुळे संबंधित महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा. जवानांनी पाण्यात धाव घेतली, त्या वेळी महिलेचा डोक्याच्या वरचा भाग पाण्याच्या बाहेर होता. तर दोन्ही हातांनी महिलेने एका खडकाला पकडले होते. जवानांनी सुखरूप महिलेला पाण्याच्या बाहेर काढले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी येरवडा अग्निशमन केंद्रातील वाहनचालक हनुमंत चकोर, तांडेल सुनील देवकर व जवान दत्तात्रय सातव, भाऊसाहेब चोरमले, सोपान पवार यांनी केली.