आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे काम पूर्ण होणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 18:18 IST2025-05-11T18:17:57+5:302025-05-11T18:18:41+5:30

आषाढी वारीपर्यंत पालखी महामार्गाचे काम पूर्णत्वास जाईन का नाही, याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

Will the work of Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Highway be completed for Ashadhi? | आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे काम पूर्ण होणार का ?

आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे काम पूर्ण होणार का ?

वाल्हे : आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीहून पंढरपूरकडे १९ जूनला प्रस्थान होत आहे. दिवे घाट ते नीरा या ५० किलोमीटर पालखी मार्गावरील चौपदरी करण काम अद्यापपर्यंतही सुरू असून, महामार्गावरील गावाजवळील बऱ्याच रस्त्यांचे काम अपूर्ण आहे. काही ठिकाणी एकाच बाजूने वाहतूक चालू असल्यामुळे छोटे-मोठे अपघात होत असतात. दौंडजच्या गावाजवळ तर काही जमीन अजून अधिग्रहण करण्याची बाकी असल्याचे माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आषाढी वारीपर्यंत पालखी महामार्गाचे काम पूर्णत्वास जाईन का नाही, याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

सासवड ते जेजुरी या मार्गाचे चौपदरीकरण गेली १७ वर्षांपूर्वी सुरू झाले. आजही काही ठिकाणी अर्धवट पद्धतीने काम झाले आहे, तर अनेक ठिकाणी पुलांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. अशा ठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना केलेल्या अद्यापपर्यंत दिसून येत नाही. पालखी सोहळ्याच्या एक-दोन दिवस आधी सुरक्षेचे तकलादू साधने लावली जातात. मात्र, पालखी परतीच्या प्रवासाआधीच ती नाहीसी झालेली असतात. पुन्हा बारा महिने या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दरम्यान महामार्गावरील झाडांची कत्तल झाल्यामुळे यंदाही वारकऱ्यांना रखरखत्या उन्हातून पायी वारी करावी लागणार आहे.

पुरंदर तालुक्यातील पालखी मार्गावर पूर्वी जुनी व मोठी सावलीची झाडे होती. झाडांच्या मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या सावलीत वारकरी थोड्याफार विसावा घेत होते. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून पालखी मार्गाचे रुंदीकरण सुरू झाल्याने मार्गावरील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे पालखी मार्गावर सध्या सावलीच राहिलेली नाही. पायी चालताना थोडावेळ उसंती घ्यायची असल्यास सावली शोधून सापडणार नाही. तर, वारकऱ्यांना पूर्णपणे उन्हात तापलेल्या मार्गावर पायी चालावे लागणार आहे. भविष्यात पालखी मार्ग रुंद होईल, पण किमान दहा वर्षे तरी या पालखी मार्गावर सावलीची झाडे येणे अशक्य असल्याचे वृक्ष प्रेमी बोलत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जेजुरीच्या मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी वाल्हेकडे मार्गस्थ होताना दौंडज खिंडीत सकाळच्या न्याहरीसाठी विसावतो. या परिसरातील जुने वटवृक्ष, पिंपळसह अगदी छोटी बोराची झाड ही काढल्याने विसावा स्थळ भकास झाला आहे. शिवाय या ठिकाणी नुकतेच झालेले, रेल्वेचे लोहमार्गावर विस्तारीकरण.

मुरूम भरण्याऐवजी या ठिकाणी काळी माती भरा

दरम्यान महामार्ग वरती रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर करण्यात येत असून त्या डिव्हायडरमध्ये झाडे लावण्याचे काम चालू आहे, मात्र डिव्हायडरमध्ये माती भरण्याऐवजी मुरूम भरला जात असल्याने ही झाडे कशी मोठी होऊ शकतात, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. मुरूम भरण्याऐवजी या ठिकाणी काळी माती भरावी व वृक्षारोपण करावे, अशी मागणी होत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा पुरंदर तालुक्यात दाखल होण्यास अद्याप दीड महिना बाकी आहे. मात्र, यादरम्यान, पालखी महामार्गाचे काम पूर्ण होणे शक्य वाटत नसून, यावर्षीही पुरंदर तालुक्यातून पायी पालखी सोहळा अडखळतच जाईल ? अशी चर्चा तालुक्यातील गावागावात होत आहे.

Web Title: Will the work of Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Highway be completed for Ashadhi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.