माळेगांव कारखाना निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार? युगेंद्र पवारांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 20:17 IST2025-03-15T20:16:57+5:302025-03-15T20:17:16+5:30

सक्षम उमेदवार मिळत असतील तर आणि माळेगावचा छत्रपती होवू द्यायचा नसेल तर निवडणूक लढवावी लागेल

Will the Malegaon factory election be Pawar vs Pawar Yugendra Pawar hints | माळेगांव कारखाना निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार? युगेंद्र पवारांचे संकेत

माळेगांव कारखाना निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार? युगेंद्र पवारांचे संकेत

बारामती: आमच्याकडे ना संस्था आहेत, ना सत्ता ना पैसा आहे. तरीही पक्षफूटीनंतर कार्यकर्ते सोबत राहतात ही सोपी गोष्ट नाही. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्हाला ठामपणे त्यांच्यामागे उभे राहावे लागेल. सक्षम उमेदवार मिळत असतील तर आणि माळेगावचा छत्रपती होवू द्यायचा नसेल तर निवडणूक लढवावी लागेल अशा शब्दात राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी माळेगांव कारखाना निवडणुकीत राजकीय आखाड्यात शड्डु ठोकणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीपाठोपाठ ‘माळेगांव’च्या राजकीय आखाड्यात पुन्हा पवार विरुध्द पवार लढती रंगणार असल्याची चिन्हे आहेत.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना युगेंद्र पवार यांनी त्यांची भुमिका मांडली. शरद पवार यांच्या बारामती दौऱ्यात शनिवारी माळेगावचे काही सभासदांनी त्यांची भेट घेतली. याबाबत पत्रकारांनी युगेंद्र पवार यांना विचाललेल्या प्रश्नावर ते म्हणाले, मागील दोन्ही निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठी साथ दिली. शरद पवार यांच्याकडे सभासद नेहमीच वेगवेगळे प्रश्न घेवून येत असतात. माळेगावचे अध्यक्ष केशवराव जगताप यांनी आंदोलनावर केलेल्या टीकेचा युगेंद्र पवार यांनी समाचार घेतला. ते आंदोलन आमच्या पक्षाचे नव्हते तर आंदोलनाला आम्ही पाठींबा दिला होता. सर्वपक्षीय सभासद आंदोलनात होते. त्यात माळेगावच्या अध्यक्षांनी राजकारण आणू नये, निरा नदीत प्रदुषित पाणी नदीत सोडले जात आहे. ऊसाला योग्य दर दिलेला नाही. कधी तरी एकदा चांगला दर दिला तेच सातत्याने सांगितले जात आहे. मग छत्रपतीनेही १५ वर्षांपूर्वी चांगला दर दिला होता, तेच सांगायचे का, असा सवाल युगेंद्र यांनी केला.

माळेगावच्या कार्यक्षेत्रातील खांडज ग्रामपंचायतीने दुषित पाण्यासंबंधी ठराव केला आहे. मी तेथे भेट दिली. दुषित पाणी शेतीला दिल्याने, प्यायल्याने कर्करुग्ण वाढत आहेत. मासे मृत्यूमुखी पडत आहेत. शेतकऱ्यांचे टनेज घटत आहे, असे ते म्हणाले. माळेगावचे अध्यक्ष माझ्या शरयू कारखान्याच्या दराबाबत बोलले. माझा कारखाना ज्या तालुक्यात आहे, तिथे आम्ही क्रमांक एकचा दर देत आहोत. तो सहकारी नव्हे तर खासगी कारखाना आहे. कर्ज काढून मी तो कष्टाने चालवत आहे. त्यांचे नेत्यांचे सात-आठ खासगी कारखाने आहेत. मी जर बोलायला लागलो तर मग त्यांना ते जड जाईल, असा इशारा पवार यांनी दिला. त्यामुळे आगामी काळात पवार विरुध्द पवार असा राजकीय संघर्ष धुमसतच राहणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान,ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजच पत्रकारांशी बोलताना माळेेगांव कारखाना निवडणुकीबाबत निवडणुका होत राहतात. पुढच्या निवडणुकांवर अजुन ठरवलेले नसल्याचे सांगितले आहे.

Web Title: Will the Malegaon factory election be Pawar vs Pawar Yugendra Pawar hints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.