वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 09:06 IST2025-04-29T09:05:49+5:302025-04-29T09:06:18+5:30
अजित पवार यांनी सदर बैठकीत विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.

वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
NCP Ajit Pawar : "पुणे शहरासह उपनगरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात द्यावे. पुणे शहर आणि उपनगरांची वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी पुणे रिंग रोडसह मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड तसेच सुरू असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढवण्यात यावा. या प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागाने योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी," असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिटच्या (PMU) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की, "राज्यात सुरू असणाऱ्या विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते, ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा."
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी लोणावळा येथील नियोजित स्काय वॉक, टायगर पॉईंट, पुणे नाशिक ग्रीन फिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेच्या नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, संभाजीनगर, अमरावतीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, सातारा सैनिक स्कूल, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, वडाळा येथील जीएसटी भवन, रेडिओ क्लब मुंबई, रत्नागिरीचे मिरकरवाडा बंदर, वढू व तळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक, पुणे येथील वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारक, कृषीभवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, पुरंदर विमानतळ आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.
दरम्यान, या बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे विभागाचे मुख्य अभियंते अतुल चव्हाण उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीवर पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग, महानगर आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, यांच्यासह पुणे मेट्रो, पीएमआरडीए, संबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.