२० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देणार; आयटीयन्स महिलेची २६ लाख ५० हजारांची फसवणूक
By नारायण बडगुजर | Updated: June 19, 2024 14:29 IST2024-06-19T14:28:13+5:302024-06-19T14:29:41+5:30
गुंतवणुकीसाठी फिर्यादी महिलेकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर संशयितांनी २६ लाख ५० हजार रुपये घेतले

२० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देणार; आयटीयन्स महिलेची २६ लाख ५० हजारांची फसवणूक
पिंपरी : शेअर्सचे ब्लॉक ट्रेड, ‘आयपीओ’मध्ये २० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देण्याचे साॅफ्टवेअर इंजिनिअर महिलेला आमिष दाखवले. त्यानंतर विश्वास संपादन करून तिच्याकडून २६ लाख ५० हजार रुपये घेत तिची फसवणूक केली. रहाटणी येथे २६ मे ते ११ जून या कालावधीत हा प्रकार घडला.
याप्रकरणी ३९ वर्षीय साॅफ्टवेअर इंजिनिअर महिलेने मंगळवारी (दि. १८) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जुही पटेल, नरेश कुमार जडेजा आणि इतर अज्ञातांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला साॅफ्टवेअर इंजिनिअर असून आयटी कंपनीत नोकरीला आहे. संशयितांनी एमएसएफएल गुजरात येथील मूळ कंपनीचे बनावट ट्रेडमार्क, संचालकांची बनावट ओळख आणि कंपनीचे बनावट वेब ॲप्लीकेशन तयार केले. त्या आधारे फिर्यादीस शेअर्सचे ब्लॉक ट्रेड व आयपीओमध्ये २० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक करण्यास तयार केले.
गुंतवणुकीसाठी फिर्यादी महिलेकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर संशयितांनी २६ लाख ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्या गुंतवणुकीवर फिर्यादीस एकूण ६३ लाख ९० हजार रुपये परतावा मिळाला आहे, असे दाखवण्यात आले. त्यांना आणखी जास्त गुंतवणूक करा, असे सांगितले. मात्र महिलेने त्यांनी गुंतवलेली मूळ रक्कम २६ लाख ५० हजार रुपये व त्यावरील परतावा मागितला असता संशयितांनी तो देण्यास नकार देत फसवणूक केली. तसेच कमिशनपोटी १२ लाख ७८ हजार आणखी पैशांची मागणी केली.