उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्रीपद घेतील का? भाजपचे आमदार प्रतिक्षेत
By राजू इनामदार | Updated: August 8, 2022 19:35 IST2022-08-08T19:34:43+5:302022-08-08T19:35:49+5:30
मंत्रीपदासाठी पुन्हा पालवली पुण्याची आशा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्रीपद घेतील का? भाजपचे आमदार प्रतिक्षेत
पुणे : मागची अडीच वर्षे सत्तेविनाच गेली, त्यानंतर सत्ता आली तर महिना उलटून गेला तरी मंत्रीमंडळच नाही. प्रतिक्षा करून कंटाळलेल्या पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची आशा आता पुन्हा पालवली आहे. त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्रीपद घेतील का याबद्दल सर्वाधिक उत्सुकता आहे.
पुणे शहरातील ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. मागील विधानसभेत तर सर्वच जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. त्यावेळी विद्यमान खासदार गिरीश बापट यांना कॅबिनेट मंत्रीपद शिवाय पुण्याचे पालकमंत्री पद दिले गेले होते. बापट खासदार झाल्यावर पुण्याचे पालकमंत्रीपद कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांना दिले गेले. त्यानंतर पाटील यांना पक्षाकडून थेट पुण्यातच बसवण्यात आले. कोथरूड विधानसभेतून त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यासाठी तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांना थांबवले गेले. पाटील विजयी झाल्यानंतर तेच मंत्री होणार अशी चर्चा होती, मात्र सरकारच बारगळले.
आता पुन्हा सत्ताप्राप्ती झाल्यानंतर पुण्यातील अनेकांनी मंत्रीपदाची मनिषा बाळगली आहे. त्यात पाटील यांचे कॅबिनेट मंत्रीपद पक्के असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याशिवाय दुसरे मंत्री करायचे झाल्यास पर्वती विधानसभेच्या माधुरी मिसाळ या ज्येष्ठ आहेत. मात्र पुण्यातून दोन मंत्री कसे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाल्यास मिसाळ यांच्यासमोर अडथळा निर्माण होईल. ग्रामीण पुणे मधून मंत्री देण्याचा विचार झाल्यास दौंडमधील राहूल कूल यांच्याशिवाय सध्या तरी भाजपासमोर दुसरा पर्याय नाही. पुणे शहराला दोनपेक्षा जास्त मंत्री देता येत नाही व ग्रामीणमध्ये एकाशिवाय दुसरा पर्याय नाही अशी जिल्ह्यातील भाजपची सध्याची स्थिती आहे.
पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्याचे पालकमंत्रीपद घ्यावे अशी आग्रही विनंती केली होती. त्याला फडणवीस यांनी मूक संमती दिल्याचे सांगण्यात येते. ते खरे झाल्यास अन्य इच्छुकांची आणखीनच अडचण होणार आहे.