महामार्गावर बीआरटी धावेल का? पीएमआरडीएच्या हद्दीत नवीन सहा बीआरटी मार्ग निर्माण करण्याचे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:14 IST2025-02-03T12:13:37+5:302025-02-03T12:14:10+5:30
पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटी सुसाट आहे. आता पीएमआरडीएच्या हद्दीत सहा बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजित करण्यात आले

महामार्गावर बीआरटी धावेल का? पीएमआरडीएच्या हद्दीत नवीन सहा बीआरटी मार्ग निर्माण करण्याचे नियोजन
- अंबादास गवंडी
पुणे : पीएमपीची वाहतूक जलद व्हावी, यासाठी आठ बीआरटी मार्ग बांधण्यात आले. परंतु, वाहतूककोंडीमुळे पुण्यातील बीआरटी मार्ग काढण्यात आले, तर पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटी सुसाट आहे. आता पीएमआरडीएच्या हद्दीत सहा बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजित करण्यात आले. यामुळे वाहतूक सुसाट होण्यापेक्षा कोंडीमुळे मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्गावर बीआरटी बांधले तरी धावेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पुढील ३० वर्षांसाठीच्या एकात्मिक वाहतूक आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. दरम्यान २०,५५० चौरस मीटर एवढ्या क्षेत्रासाठी हा आराखडा तयार करण्यात आला असून, पुढील ३० वर्षांत पीएमआरडीएच्या हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गचे जाळे नियोजित आहे.
यामध्ये रावेत ते राजगुरूनगर, गवळी माथा चौक ते शेवाळेवाडी, रावेत ते तळेगाव दाभाडे, चांदणी चौक ते हिंजवडी या ११७ किमी मार्गाबरोबर लोणी काळभोर ते केडगाव, भूमकर चौक ते चिंचवड चौक या ४६ किमी मार्गाचा समावेश आहे. या सहा नवीन बीआरटी मार्गामुळे पीएमपआरडीच्या हद्दीत वाहतुकीचा वेग वाढेल, असा निष्कर्ष काढण्यात आले आहे. सध्याची महामार्गाची अवस्था पाहता कोणत्याही ठिकाणी मुबलक जागा नाही. त्यामुळे आहे त्या मार्गावर रस्ता अरुंद पडत असून, वाहतूककोंडी होत आहे. त्यामध्ये आता बीआरटी बांधले, तर पुन्हा रस्ते अरुंद होऊन वाहतूक सुलभ न होता, कोंडीची शक्यता जास्त आहे.
पीएमआरडीएमुळे पीएमपीला फटका
पीएमपीकडून नागरिकांच्या सोयीसाठी पीएमआरडीएच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते, परंतु या ठिकाणी अनेक वेळा पीएमपीच्या गाड्या रिकामे धावतात. त्यामुळे उत्पन्नात घट होते. त्याचा फटका पीएमपीला बसतो. शिवाय पीएमआरडीएकडून संचलनापोटी पीएमपीला आर्थिक मदत करताना हात आखडले जाते. संचलनापोटी देण्यात येणारे रक्कमही वेळेवर मिळत नाही. शिवाय नाशिक, मुंबई, नगर आणि सोलापूर महामार्ग रस्ता अपुरा ठरत आहे. त्या बीआरटी बांधल्यावर पुन्ही महामार्गाची रुंदी कमी होणार आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या हद्दीत बीआरटी बांधून कोणाचा फायदा होणार आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे.
मोजक्याच गाड्या धावतात पीएमपी, पीएमआरडीच्या हद्दीत
मोजक्याच पीएमपीच्या गाड्या धावत असून, सरासरी ३० मिनिटांत एक बस धावते. वाढत्या लोकसंख्येनुसार गाड्यांची संख्या वाढली तरी त्याला मर्यादा येणार आहे. शिवाय पीएमपीचे ६४१ किमी व १८ नवे बस मार्ग सुचविण्यात आले आहेत. तर १० टर्मिनल तयार करण्यात येणार आहे. तसेच सहा नवे बीआरटी मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहे. याचा प्रवाशांना किती फायदा होईल, हे सांगता न येण्यासारखे आहे.
हे आहेत प्रस्तावित बीआरटी मार्ग
-रावेत ते राजगुरूनगर
-गवळी माथा चौक ते शेवाळेवाडी
-रावेत ते तळेगाव दाभाडे
-चांदणी चौक ते हिंजवडी
-लोणी काळभोर ते केडगाव
-भूमकर चौक ते चिंचवड चौक
आताची बीआरटी संख्या
एकूण बीआरटी मार्ग - आठ
धावणाऱ्या बस - १ हजार
प्रवासी संख्या - सात लाख