दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 18:15 IST2026-04-04T17:56:22+5:302026-04-04T18:15:23+5:30
मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत आता जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
मागील अनेक महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मधल्या काळात या चर्चा थांबल्या होत्या, आता पुन्हा एकदा या चर्चा सुरू झालेल्या आहेत.या मुद्द्यावर दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून अजूनही कोण स्पष्ट बोलत नाही. दरम्यान, आज जय पवार यांनी यावर आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'विलिनीकरणासंदर्भात माझी वैयक्तिक भूमिका नाही. मी छोटा आहे, सुनेत्रा पवार असतील, पार्थ दादा असतील बाकीचे जेष्ठ नेते असतील ते ठरवतील', असेही जय पवार म्हणाले.
जय पवार म्हणाले, विलिनीकरणासंदर्भात माझी वैयक्तिक भूमिका नाही. मी छोटा आहे, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ दादा असतील बाकीचे जेष्ठ नेते असतील ते ठरवतील. मला वाटतंय की आम्ही कुटुंब म्हणून सर्व एकत्र राहावं. जेव्हा दादा आपल्याला सोडून गेले तेव्हा पवार कुटुंब एकत्र होते, आजही आम्ही एकमेकांशी बोलतो. असे सांगत जय पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुद्दावर बोलणे टाळले.
"विलिनीकरण हा राजकारणातील भाग आहे, त्यावर मी जास्त संभाषण करणे मला योग्य वाटत नाही. यासंदर्भात पक्षातील वरिष्ठ नेते बोलतील, असेही पवार म्हणाले.
"बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, शरद पवार साहेब सुद्धा आग्रह करत आहेत की, निवडणूक बिनविरोध व्हावी. बारामतीकरांना देखील वाटतंय की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी. दादांचं काम अनेक वर्ष सर्वांनी पाहिलं आहे, सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्याही मनात निवडणूक बिनविरोध व्हावी हीच भावना आहे, असेही जय पवार म्हणाले.
काँग्रेसने सुद्धा बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी: अनिल देशमुख
बारामतीची पोटनिवडणूक लागत आहे. त्याबाबतीत आमच्या पक्षातील सुप्रिया सुळे यांनी जाहीर केला आहे की, आमच्या पक्षातर्फे कोणताही उमेदवार लढणार नाही. आता बाकी पक्षाचा प्रश्न आहे, काँग्रेसच्या बातम्या आल्या होत्या,पण मला असं वाटतं की अजित दादांनी काँग्रेस शिवसेना या महाविकास आघाडीतील सर्वांशी एकत्र राहून काम केलं त्यामुळे काँग्रेसने सुद्धा बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी असं मला वाटतं, असेही अनिल देशमुख म्हणाले.