पत्नीचा दगडाने ठेचून खून; पतीची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, खडकवासला भागातील धक्कादायक घटना
By विवेक भुसे | Updated: February 26, 2024 15:06 IST2024-02-26T15:05:58+5:302024-02-26T15:06:08+5:30
रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करून जंगलात गेल्यावर त्यांच्यात काही वाद झाला असावा, त्यामध्ये पतीने पत्नीचा खून करून आत्महत्या केली

पत्नीचा दगडाने ठेचून खून; पतीची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, खडकवासला भागातील धक्कादायक घटना
शिवणे : पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केल्यानंतर स्वतःने देखील झाडाला गळफास घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी खडकवासला धरणाच्या पाठीमागील पिकॉक- बे परिसरात घडली. सोमनाथ सखाराम वाघ (वय ५३, रा. वारजे माळवाडी ) आणि पत्नी सुवर्णा सोमनाथ वाघ (वय ४२) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस ठाण्यातून प्राप्त माहितीनुसार दोघे पती-पत्नी रविवारी सकाळी साडेनऊ वाजता दुचाकीवरून घरातून बाहेर पडले होते.
उत्तमनगर मार्गे खडकवासला जवळील पिकॉक बे परिसरात गेले. त्या ठिकाणी त्यांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करुन दोघेजण रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या जंगलात गेले. त्या ठिकाणी त्यांच्या मध्ये काही वाद झाला असावा ज्यामुळे पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर पतीने स्वतःच्या ट्रॅक पॅंटने झाडाला गळफास लावून घेतला. सकाळी उशीर झाला तरी दोघे घरी परत आले नाहीत म्हणून त्यांची मुलगी व पुतण्याने त्यांचा शोध सुरू केला असता सायंकाळी त्यांची दुचाकी पिकॉक बे परिसरात आढळून आली. त्या परिसरात शोध घेतला असता त्यांना आईचा मृतदेह आढळला तर वडिलांनी झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी या घटनेची माहिती उत्तमनगर पोलिसांना कळवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसूफ शेख तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता चौरे, पोलीस कर्मचारी प्रसाद जोशी, धनंजय बिटले घटनास्थळी दाखल झाले. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक युसूफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.