भीती राहिलीच नाही! पुणे शहरात सर्रासपणे विक्री सुरु; १३ लाखांचा तब्बल ६४ किलो गांजा जप्त
By नम्रता फडणीस | Updated: May 2, 2025 18:13 IST2025-05-02T18:12:10+5:302025-05-02T18:13:57+5:30
पोलिसांनी नशेची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून, अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत १३ लाखांचा तब्बल ६४ किलो गांजा जप्त केला

भीती राहिलीच नाही! पुणे शहरात सर्रासपणे विक्री सुरु; १३ लाखांचा तब्बल ६४ किलो गांजा जप्त
पुणे: शहरात अमली पदार्थांची विक्री सर्रासपणे सुरू आहे. पोलिसांनी नशेची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत १३ लाख २८ हजार रुपयांचा ६४ किलो गांजा जप्त केला आहे. ओडिशा आणि धुळ्यातून पुणे शहरात गांजा विक्रीसाठी पाठविण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.
पप्पू चक्रधर देवरी (वय ३२, रा. कलंड, रसलपूर, जि. जसपूर, ओडिशा), चंदन सुभाष कुंवर (वय १९, रा. तरोल, सेनापती काॅलनी, जि. कटक, ओडिशा), तसेच राकेश रुपसिंग पावरा (वय २५, रा. शिरपूर, जि. धुळे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचारी गस्त घालत होते. त्या वेळी देवरी आणि कुंवर हे ओडिशातून गांजा विक्रीस घेऊन आल्याची माहिती मिळाली. पुणे स्टेशन परिसरात सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली. पिशवीत गांजा आढळून आला. पोलिसांनी पिशवीतून सहा लाख २४ हजार रुपयांचा ३० किलो गांजा जप्त केला.
दरम्यान, जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर वाकडेवाडी एसटी स्थानक परिसरात धुळ्याहून एक जण गांजा विक्रीस घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून पावराला पकडले. त्याच्याकडून सात चार हजार रुपयांचा ३४ किलो गांजा जप्त करण्यात आला. अमली पदार्थ तस्करीप्रकरणी देवरी आणि कुंवर यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात, तसेच पावरा याच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अमली पदार्थ विरोधी पथकातील (दोन) पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, रवींद्र रोकडे, मयूर सूर्यवंशी, चेतन गायकवाड, सय्यद साहिल शेख, उदय राक्षे, अझिम शेख, युवराज कांबळे, आझाद पाटील, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर, नीलम पाटील यांनी ही कामगिरी केली.