पुणे (यवत) : यवतमध्ये सकाळी एका तरूणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला यवत पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. मात्र काही वेळातच संतप्त झालेल्या जमावाने वाहनांची तोडफाड व जाळपोळ केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या आता यवतमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. तणावाचे वातावरण का निर्माण झाले? याबाबत अजित पवारांनी माहिती दिली आहे.
अजित पवार म्हणाले, मध्यप्रदेश मध्ये काही घडलेलं होतं. एका तरुणाने त्याबाबत सोशल मीडियावर स्टेट्स ठेवलं होत. त्याचा यवतशी काही संबंध नव्हता. त्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. आता पोलिसांनी पूर्णपणे परिस्थिती आटोक्यात आणली आहे. सर्व पोलीस यंत्रणा इथं कार्यरत आहे. तसेच एनडीआरएफ जवानही तैनात आहेत. यवतमध्ये अशी घटना कधीही घडली नाही. ते स्टेट्स ठेवल्यामुळे झालं आहे. आज आठवडे बाजार असतो तो आज बंद आहे. काही भीतीचे वातावरण नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. त्याने पोस्ट टाकली आहे. त्याचा इथं काही संबंध नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. मध्यप्रदेश मध्ये काही घडलेलं त्याने स्टेटस ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उद्रेक झाला होता. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आता १४४ लागू केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
माध्यमांना केले आवाहन
तुम्ही माध्यमं काळजीपूर्वक काम करा. भीतीचे वातावरण निर्माण करू नका. तुमचं काम आहे. वस्तुस्थिती दाखवा पण घाबरवू नका. आता परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आहे. आम्ही सर्व जण यावर लक्ष ठेवून आहोत. पोलिसही यवतमध्ये मोठ्या प्रमाणात तैनात आहेत.