आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी शहर तसेच देहू फाटा परिसरात अवैद्य पार्किंग केलेल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांकडूनकारवाई केली जात आहे. अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहने टोईंग वाहनात उचलून जप्त केली जात आहेत. मात्र वाहने पार्किंग करण्यासाठी संबंधित विभागाने पर्यायी जागा उपलब्ध करून दिलेली नाही किंवा सम - विषम तारखेचे फलक बसविले नसल्याने शहरात वाहने पार्किंग करायची कुठे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. देहू फाट्याजवळील काळे कॉलनीसमोर गुरुवारी (दि. १५) पोलिसांनी दुचाकी वाहनांवर कारवाई केली. रस्त्यालगत अवैद्य पार्किंग केलेल्या दुचाकींना टोईंग व्हॅनमध्ये उचलून नेण्यात येत होते. दरम्यान एक दुचाकी मालक थेट टोईंग व्हॅनसमोर रस्त्यावर आडवा झोपला. पोलिसांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र तो रस्त्यावरून उठला नाही. बराच वेळ पोलीस व त्याच्यात बाचाबाची झाली. सदरचा प्रकार पाहून अनेक प्रवाशी सभोवताली गर्दी करत आळंदी शहर व देहू फाट्यावर वाहने पार्किंग करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच सर्वत्र सम - विषम तारखेचे फलक बसविण्यात यावेत, तोपर्यंत वाहनांवर कारवाई करू नये अशी मागणी केली. दरम्यान पोलिसांनी सदर दुचाकी मालकाला बाजूला केले. त्याची समजूत काढून दंड भरून घेतला. त्यांनंतर त्याची मोटरसायकल त्याच्या ताब्यात दिली.
सदर इसमाची मोटरसायकल नो पार्किंग मध्ये असल्याने टोईंग कारवाई करण्यात आली होती. संबंधित नागरिक दंड भरण्यास तयार नव्हता. त्याने मद्यप्राशन केलेले होते. तो टोईंग गाडी समोर रस्त्यावर झोपला. असे कृत्य केल्यामुळे आपल्यावर होणारी कारवाई टळली जाईल असा त्याचा समज होता. त्या इसमास समजून सांगितल्यानंतर दंड भरून तो मोटरसायकल घेऊन गेला. - सतीश नांदुरकर, पोलीस अधिकारी वाहतूक विभाग.