'तू म्हाताऱ्या माणसावर दादागिरी का करतो', तरुणावर काेयत्याने वार

By नारायण बडगुजर | Updated: December 6, 2023 18:27 IST2023-12-06T18:27:09+5:302023-12-06T18:27:36+5:30

तरुणाच्या सासू व पत्नीला देखील धक्काबुक्की केली

Why do you bully an old man hit a young man with a spear | 'तू म्हाताऱ्या माणसावर दादागिरी का करतो', तरुणावर काेयत्याने वार

'तू म्हाताऱ्या माणसावर दादागिरी का करतो', तरुणावर काेयत्याने वार

पिंपरी : तू म्हाताऱ्या माणसावर दादागिरी का करतो, असे म्हणत तीन ते चार जणांनी तरुणावर कोयत्याने वार करून दारूच्या बाटलीने मारहाण केली. तसेच तरुणाच्या सासू व पत्नीला देखील धक्काबुक्की केली. पिंपरी येथे सोमवारी (दि. ४) रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान ही घटना घडली.

आकाश शम्मी सिंह (३१, रा.भाटनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. ५) पिंपरी पोलिस ठाण्यात पिर्याद दिली. आकाश भुंगा कांबळे (२५, रा. निराधारनगर, पिंपरी), संतोष पवार, राज आणि पवन मेवाते यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिंह यांच्याकडे एक म्हाताऱ्या व्यक्तीने जेवणासाठी पैसे मागितले. तू रोज मला का पैसे मागतो, असे म्हणत फिर्यादी सिंह रागावले. तू म्हाताऱ्याला माणसावर दादागिरी करतो का, असे म्हणत आकाश कांबळे याने फिर्यादी सिंह यांना शिवीगाळ केली. मी कोण आहे ते तुला माहिती नाही, असे म्हणत त्याने इतरांना बोलावून घेतले व फिर्यादीच्या घरात घुसले. फिर्यादीची सासू, पत्नी यांना धक्काबुक्की केली. याला आज जिवंत सोडायचे नाही, असे म्हणत त्यांनी कोयत्याने फिर्यादी सिंह यांच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. तसेच कोयता दरवाजा व खिडकीवर मारून नुकसान केले. जर का पोलिसांत तक्रार केली तर तुम्हा सर्वांना जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. हातातील कोयता भिरकावत दहशत निर्माण केली. तसेच बीयरची बाटली फिर्यादी सिंह यांच्या पाठीत मारत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Why do you bully an old man hit a young man with a spear