ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 21:59 IST2025-07-30T21:57:42+5:302025-07-30T21:59:24+5:30
पुणे जिल्ह्यातील खराडी येथील स्टे बर्ड नामक हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर रविवारी (दि. २७) पहाटे पोलिसांनी छापा टाकला.

ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
पुणे जिल्ह्यातील खराडी येथील स्टे बर्ड नामक हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर रविवारी (दि. २७) पहाटे पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांची ही कारवाई संशयास्पद असल्याचे दिसून येते. मात्र, तो तपासाचा भाग आहे. पोलिसांवर अजूनपर्यंत विश्वास आहे. दरम्यान, पोलिसांनी टाकलेल्या छाप्याचे व्हिडीओ फुटेज व फोटो कोणी व्हायरल केले? याबाबत सखोल तपास व्हावा अशी मागणी शरदश्चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बुधवारी (दि. ३०) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना भेटून केली. अशी माहिती खेवलकर यांचे वकील अॅड. विजयसिंह ठोबरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या पार्टी प्रकरणामध्ये खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये दोन तरुणींचा समावेश आहे. पार्टीत पोलिसांना अमली पदार्थ सदृश्य पदार्थ मिळून आले आहेत. मात्र, डॉ. खेवलकर यांना अडकवण्यासाठी पोलिसांनी हेतूपुरस्कर ही कारवाई केली असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. रोहिणी खडसे यांनी सोमवारी (दि. २८) रात्री शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांची भेट घेऊन नि:पक्षपाती तपास करण्याची विनंती केली. त्यानंतर खडसे यांनी बुधवारी (दि. ३०) दुपारी बारा वाजता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. त्यामध्ये प्रामुख्याने तीन मागण्या करण्यात आल्या आहेत.
डॉ. खेवलकर यांची व काही आरोपींची ओळख नव्याने झाली आहे. पार्टीमध्ये उपस्थित असलेले दोन जण अनोळखी होते. त्यांचा आमचा संबंध नव्हता. पाच दिवस त्यांनी आमच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. वारंवार फोन केला. इतर हॉटेल बंद असल्यामुळे आम्ही येथे आल्याचे सांगितले. ते आल्यानंतरच पोलिसांची रेड पडली. पोपटाणी आणि यादव हे तोंड ओळख असताना, लगट करून आले. याबाबत संशय आहे. त्या मुलींशी डॉक्टरांचा काही संबंध नाही. पोलिसांनी तपासणी करण्यापूर्वीच तरुणीने पर्समधील अमली पदार्थ काढून पोलिसांच्या हवाली करणे हे अतिशय संशयास्पद आहे.
डॉ. खेवलकर यांचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे. जळगावचे तथाकथीत एक आमदार दावा करतात, त्यांच्या गुगल ड्राईव्हचा पासवर्ड माझ्याकडे आहे. तो पासवर्ड त्यांच्याकडे कसा गेला. ते मोबाईलमध्ये त्यांचे फोटो सुद्धा पर्सनल दाखवत होते. त्यामुळे आमचे फोटो कोणी व्हायरल केले. तसेच, पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी जर फक्त पोलिस उपस्थित होते; तर, त्यावेळेचे व्हिडीओ व फोटो कोणी व्हायरल केले? याबाबतही चौकशी व्हावी अशी मागणी खडसे यांनी केल्याचे अॅड. ठोबंरे यांनी सांगितले.
या भेटीनंतर, पोलिस आयुक्तांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिले. यापुढे कुठलेही फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होणार नाहीत. जे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, त्याचीही चौकशी केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. आम्ही दिलेल्या अर्जाची पोहोच आम्हाला मिळाली आहे. पोलिस तपास करून लवकरच आम्हाला न्याय देतील, अशी आमची अपेक्षा आहे, असेही ठोंबरे म्हणाले.