Ajit Pawar: 'जिल्हा कोणाच्या मागे आहे', नगर परिषदांच्या निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 12:40 IST2025-12-22T12:38:59+5:302025-12-22T12:40:21+5:30
Pune Local Body Election Result 2025 पुणे जिल्ह्यातील बारामती, लोणावळा, दौंड, शिरूर, जेजुरी, भोर, इंदापूर, फुरसुंगी, वडगाव मावळ आणि माळेगाव या दहा नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदी अजित पवारांचे नगराध्यक्ष झाले

Ajit Pawar: 'जिल्हा कोणाच्या मागे आहे', नगर परिषदांच्या निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया
पुणे : पुणे जिल्ह्यातील १७ नगर परिषदांपैकी तब्बल १० नगर परिषदांचे नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे निवडून आल्यानंतर पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी जिल्हा कोणाच्या मागे आहे, अशी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.
न्यायालयाच्या आदेशानंतर तीन ते चार वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात आहेत. राज्यातील व पुणे जिल्ह्यातील नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल रविवारी लागला. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, लोणावळा, दौंड, शिरूर, जेजुरी, भोर, इंदापूर, फुरसुंगी, वडगाव मावळ आणि माळेगाव या दहा नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष झाले. तर भाजप ३, शिंदे सेनेला ४ ठिकाणी नगराध्यक्ष पदावर विजय मिळाला. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी रविवारी दुपारी बोलताना जिल्हा कोणाच्या मागे आहे, अशी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.
जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होताच पुणे जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १६१ जागा जिंकत पहिला क्रमांक पटकावला आहे. भाजप ९९ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर यापूर्वी कधीही प्रमुख शर्यतीत नसलेल्या शिवसेना (शिंदे गट) ने जोरदार मुसंडी मारत ५१ जागा जिंकून तिसरे स्थान मिळवले आहे.