पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यालय नक्की कोणाचे; २ गटाचे शहराध्यक्ष आमनेसामने, म्हणतात....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 21:13 IST2023-07-07T21:12:50+5:302023-07-07T21:13:34+5:30
प्रशांत जगताप यांनी फूट पडली त्याच दिवशी कार्यालय आपल्या वैयक्तिक नावावर असल्याचे स्पष्ट केले आहे

पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यालय नक्की कोणाचे; २ गटाचे शहराध्यक्ष आमनेसामने, म्हणतात....
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्यालय कोणी स्वत:च्या नावावर कसे काय करून घेऊ शकते? ही पक्षाची केलेली फसवणूकच आहे, अशी टीका अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केली. आम्ही नवे कार्यालय पाहूच, पण हे कार्यालय आमच्या ताब्यात देऊन किमान पक्षाची केलेली फसवणूक तरी थांबवा, असे मानकर म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे डेंगळे पुलाजवळ मोठे कार्यालय आहे. अलीकडेच ते झाले. अजित पवार यांच्याच हस्ते त्याचे उद्घाटन झाले. या कार्यालयावर कागदोपत्री शरद पवार गटातच असलेले शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावावर आहे. पक्षात फूट पडल्यावर आता जगताप यांनी कार्यालय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे, असे म्हटले आहे, तर मानकर यांनी पक्षाचे कार्यालय स्वत:च्या नावावर करून घेताना काहीच कसे वाटले नाही, असा प्रश्न केला.
अत्याधुनिक साधनसुविधांनी सज्ज असलेल्या या कार्यालयात अजित पवार यांनी स्वत: अनेक गोष्टी सांगून, करून घेतल्या आहेत. या कार्यालयावरून बरीच वादावादी होण्याची चिन्हे आहेत. मानकर यांनी आम्ही आमचे नवे कार्यालय लवकरच पाहू, असे म्हटले असले तरी या कार्यालयाचा दावा सहजासहजी सोडण्यास अजित पवार समर्थक कार्यकर्ते तयार होतील असे दिसत नाही. प्रशांत जगताप यांनी फूट पडली त्याच दिवशी कार्यालय आपल्या वैयक्तिक नावावर असून, त्यावर कोणालाही हक्क सांगता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.