ड्रेनेजलाइनचे काम करताना अचानक मातीचा ढिगारा अंगावर कोसळला; गुदमरून कामगाराचा मृत्यू, तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:14 IST2025-08-05T10:13:55+5:302025-08-05T10:14:54+5:30

अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांना वाचवले, मात्र शेवटच्या कामगाराला बाहेर काढताना रात्र झाली अन् त्याचा मृत्यू झाला

While working on a drainage line, a pile of soil suddenly fell on him; worker dies of suffocation, three injured | ड्रेनेजलाइनचे काम करताना अचानक मातीचा ढिगारा अंगावर कोसळला; गुदमरून कामगाराचा मृत्यू, तिघे जखमी

ड्रेनेजलाइनचे काम करताना अचानक मातीचा ढिगारा अंगावर कोसळला; गुदमरून कामगाराचा मृत्यू, तिघे जखमी

शिवणे : नांदेड सिटीतील कलाश्री सोसायटीसमोर नांदेड सिटी कंपाउंड वॉलच्या बाहेरील बाजूस महापालिकेच्या ड्रेनेजलाइनच्या कामादरम्यान मोठा अपघात घडला आहे. खड्ड्यात उतरून काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर मातीचा ढिगारा अचानक कोसळला, त्या ढिगाऱ्याखाली चार कामगार गाडले गेले. अग्निशामक दलाने त्यांना बाहेर काढले, मात्र त्यातील एकाचा गुरमरून मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. कन्नीराम प्रजापती (मूळ राहणार झारखंड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर खुर्शीद अली, चितलाल प्रजापती असे जखमींची नावे आहे, अन्य एका जखमीचे नाव रात्री उशिरापर्यंत जाहीर केले नव्हते.

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, पुणे महापालिकेच्या जायका प्रकल्पाअंतर्गत नांदेड सिटी येथील कलाश्री सोसायटीच्या वॉल कंपाउंडला लागून ड्रेनेजलाइनचे काम सुरू होते. त्या कामासाठी जेसीबीने साधारण आठ फुटापर्यंत खड्डा खोदण्यात आला होता. खोदलेल्या खड्ड्यातील माती, खड्ड्यातील मातीचा ढिगारा खड्ड्याच्या जवळच ठेवला होता. त्या खड्ड्यामध्ये चार कामगार पाइपलाइनचे काम करण्यासाठी उतरले होते. ते खाली बसून काम करत असतानाच अचानक मातीचा ढिगारा खड्ड्यात त्यांच्या अंगावर कोसळला. खड्ड्याखाली चारही कामगार गाडले गेले. ही घटना आणखी एका कामागराच्या लक्षात येताच त्याने तातडीने अग्निशामक दलाला संपर्क केला. काही वेळात अग्निशामक दलाचे जवान तेथे पोहोचले. खड्डा पुन्हा उकरून चौघांना बाहेर काढले. शेवटचा कामगार कन्नीराम प्रजापती याला बाहेर काढताना रात्रीचे साडेनऊ वाजले होते. तोपर्यंत दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर अन्य तीन कामगार जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जायका प्रोजेक्ट अंतर्गत येथे काम चालू होते. सब ठेकेदाराकडून हे काम करत होता. पालिकेचे अभियंते घटनास्थळी गेले आहेत. त्यांच्या अहवालानंतर आम्ही अहवाल देणार आहोत. जायका प्रोजेक्टचे काम करताना सुरक्षेची सर्व खबरदारी घेतली जात आहे. ही घटना कशामुळे घडली याचा शोध घेत आहोत.- पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Web Title: While working on a drainage line, a pile of soil suddenly fell on him; worker dies of suffocation, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.