महायुतीतून लढायचे की स्वतंत्रपणे; अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री शिंदेच घेतील - रवींद्र धंगेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 20:00 IST2025-12-11T19:59:39+5:302025-12-11T20:00:37+5:30
शिवसेना युवकांना केंद्रबिंदू मानून निवडणुकीला सामोरे जाणार असून पक्षातर्फे अधिकाधिक युवकांनाच उमेदवारी दिली जाणार आहे.

महायुतीतून लढायचे की स्वतंत्रपणे; अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री शिंदेच घेतील - रवींद्र धंगेकर
पुणे: आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्व प्रभागातील सर्व जागा लढण्याची आमची तयारी आहे. मात्र, महायुतीतून लढायचे की स्वतंत्रपणे याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील, असे शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तसेच शहराचे भविष्य घडविण्यासाठी युवकांना केंद्रस्थानी ठेवून पक्षातर्फे युवा उमेदवारांनाच अधिक संधी दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत धंगेकर बोलत होते. यावेळी महिला विभागाच्या सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, उपशहर प्रमुख नितीन पवार, शहर सचिव संदीप शिंदे, हवेली तालुका प्रमुख नमेश बाबर उपस्थित होते.
धंगेकर म्हणाले, महापालिका निवडणूकीसाठी पक्षातर्फे निशु:ल्क अर्जवाटप केले जात असून १५ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर वरिष्ठाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. आपल्या लोकसंख्येत युवकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सर्वत्र नेत्यांच्या नातलगांनाच उमेदवारी दिली जात असल्याने युवक हतबल झाले आहेत. त्यामुळेच शिवसेना युवकांना केंद्रबिंदू मानून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे पक्षातर्फे अधिकाधिक युवकांनाच उमेदवारी दिली जाणार आहे.