सिलिंडरच्या महाराणी स्मृती ईराणी कुठे आहेत? पुण्यात गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:25 IST2025-04-10T13:22:58+5:302025-04-10T13:25:10+5:30

सरकारने 50 रू ने गॅसचे दर वाढविल्याने लाडक्या बहिणींच्या संसाराचं गणित बिघडलं

Where is Smriti Irani the Queen of Cylinders? Protest against gas cylinder price hike in Pune | सिलिंडरच्या महाराणी स्मृती ईराणी कुठे आहेत? पुण्यात गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

सिलिंडरच्या महाराणी स्मृती ईराणी कुठे आहेत? पुण्यात गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

पुणे: पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांची वाढ केल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने आणखी एक झटका दिला आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. 

महत्वाची बाब म्हणजे ही दरवाढ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) लाभार्थी आणि गैर-लाभार्थी दोघांनाही लागू आहे. सुधारित किमती ८ एप्रिलपासून लागू होणार आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गॅस सिलिंडरची किंमत ५०० रुपयांवरून ५५० रुपयांपर्यंत वाढेल. इतर ग्राहकांसाठी, ती ८०३ रुपयांवरून ८५३ रुपयांपर्यंत वाढणार असल्याची माहिती, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली होती. 

या निर्णयानंतर विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सामान्य माणूसही महागाईखाली भरडला गेला असताना असा निर्णय चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पुण्यातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून पुण्यात महागाई विरोधात गॅस दरवाढ विरोधात चूल पेटवा आंदोलन केले आहे. सरकारने 50 रू ने गॅसचे दर वाढविल्याने लाडक्या बहिणींच्या संसाराचं गणित बिघडलं आहे. सरकारच्या दरवाढ निर्णयाविरोधात चूल पेटवा आंदोलन करण्यात येत आहे. सिलेंडरच्या महाराणी स्मृती ईराणी कुठे आहेत? अशा प्रकारच्या घोषणाबाजी या आंदोलनात केली जात आहे. 

आता ग्राहकांना ९०९ मोजावे लागणार 

महाराष्ट्रात गॅस सिलिंडर ८५९ रुपयांना उपलब्ध होत होते. शासनाने त्यात ५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सिलिंडरसाठी ग्राहकांना आता ९०९ रुपये मोजावे लागणार आहेत. उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत ६० हजार कुटुंबांना गॅसचे वितरण करण्यात आले आहे. या कुटुंबांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर मिळत होता. आता त्यासाठी ५५० रुपये मोजावे लागणार आहेत. उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी गरीब आहेत. रिकामे सिलिंडर घरी ठेवून ते चुलीवर स्वयंपाक करीत होते. आता पुन्हा गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे.  

Web Title: Where is Smriti Irani the Queen of Cylinders? Protest against gas cylinder price hike in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.