Pune: ड्रग्ज नेमकं येतंय कुठून; पोलिस प्रशासन करतंय काय? पुण्यातील तरुणाईचा चिंतेचा विषय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:51 IST2025-07-28T12:50:33+5:302025-07-28T12:51:05+5:30
शहरात काही छोट्या टोळ्या ग्रॅममध्ये मोठ्या पुरवठादारांकडून ड्रग्ज घेऊन ते कॉलेज परिसर, पार्टी, पब अथवा अशा प्रकारच्या हॉटेलमध्ये पोहोचवण्याचे काम करतात

Pune: ड्रग्ज नेमकं येतंय कुठून; पोलिस प्रशासन करतंय काय? पुण्यातील तरुणाईचा चिंतेचा विषय
पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. खराडीत रविवारी पहाटे गुन्हे शाखेने हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर केलेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा ललित पाटील प्रकरणाला उजाळा मिळाला आहे. सक्षम पोलिस प्रशासन असतानादेखील शहरात कोट्यवधींचे अमली पदार्थ येतातच कसे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ड्रग्ज तस्करांशिवाय आता शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडेदेखील ड्रग्ज सापडत असल्याने हा विषय चिंतेचा बनला आहे. शहरात गोवा, कर्नाटक, तेलंगणा यासह महाराष्ट्रातील मुंबई, कोकण अशा ठिकाणांहून ड्रग्ज शहरात येत असल्याचे अनेकदा पोलिस कारवायांवरून समोर आले आहे. मात्र, एकूणच ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांकडून होणारी कारवाई अपुरी पडत असल्याचे चित्र आहे.
हाय प्रोफाइल रॅकेट...
शहरात वारंवार कोट्यवधींचे अमली पदार्थ पोलिस जप्त करत आहेत. मात्र, तरीही सर्रास अमली पदार्थांची विक्री, सेवन होत असल्याने या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नसल्याचे चित्र आहे. २०२३ मध्ये बंडगार्डन पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एमडी ड्रग्जची विक्री केली जात होती. ललित पाटील प्रकरणानंतर ही बाब समोर आली. न्यायालयीन कोठडीत असताना वैद्यकीय उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथूनच ललित पाटील हा ड्रग्जचे रॅकेट चालवत होता, हे तपासात समोर आले होते. त्यानंतरही शहरात अनेक हाय प्रोफाइल रॅकेट सक्रिय असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोकेनसारखे ड्रग्ज शहरात येतात कसे..
गोल्डन ट्रँगल आणि क्रिसेंट प्रकारामध्ये कोकेन देशात आणले जाते. अफगाणिस्तान, कंबोडिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, इराण येथून क्रिसेंट प्रकाराचे कोकेन देशात येते, तर व्हिएतनाम, म्यानमार येथून आसाममार्गे गोल्डन ट्रँगल नामक कोकेन देशात येते. याशिवाय नेदरलँड्स अथवा आफ्रिकन देशांतूनही कोकेनसारखे ड्रग्ज देशात आणले जातात. हे ड्रग्ज पुढे पार्सल, कुरिअर, डार्क वेबच्या माध्यमातून देशात इतरत्र पाठवले जाते. शहरात गोवा, दिल्ली, बंगळुरू अथवा मुंबई येथून हायवेवरून ट्रक, कार अथवा दुचाकीद्वारे ते लपवून आणले जाते. विमानानेदेखील शहरात ड्रग्ज येत असल्याचे कस्टम विभागाने नुकत्याच बँकॉकवरून आलेल्या ड्रग्जच्या कारवाईवरून दिसून आले आहे.
शहरात सप्लाय करण्यासाठी छोट्या टोळ्या सक्रिय
शहरात काही छोट्या टोळ्या ग्रॅममध्ये मोठ्या पुरवठादारांकडून ड्रग्ज घेऊन ते कॉलेज परिसर, पार्टी, पब अथवा अशा प्रकारच्या हॉटेलमध्ये पोहोचवण्याचे काम करतात. यासाठी अनेकदा डिलिव्हरी बॉयचा अथवा ॲपआधारित प्लॅटफॉर्मचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.
शहरात झालेल्या मोठ्या कारवाया...
२४ जुलै रोजी बँकॉक येथून आलेल्या प्रवाशाच्या सामानात साडेदहा कोटी रुपयांचे अमली पदार्थ कस्टम विभागाने पकडले. त्यापूर्वी कोंढवा, बिबवेवाडी परिसरात २७ लाखांचे एमडी व अन्य अमली पदार्थ पकडले होते. हडपसर परिसरात ८ लाखांचे ड्रग पकडले होते, त्यात २१ किलो गांजा होता. याशिवाय राजस्थान येथून अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अमली पदार्थविरोधी पथकाने पकडले होते. त्याच्याकडून १५ लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठ येथील रेड लाइट एरियामधून एकाला अटक करत त्याच्याकडून ड्रग्जच्या ७१८ गोळ्या पकडल्या होत्या. त्याने पश्चिम बंगाल येथून या गोळ्या आणल्या होत्या, या सर्व कारवाया पोलिसांनी जुलै महिन्यात केल्या. त्यापूर्वी जानेवारी महिन्यात दीड कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी पकडले होते. गेल्या वर्षी २०२४ मध्ये कुरकुंभ येथील एमडी बनवणाऱ्या अर्थकेम लॅबोरेटरीजवर छापा टाकून ३ हजार ६७४ कोटी रुपयांचे एमडी जप्त करत देशातील सगळ्यात मोठी कारवाई केली होती.
तरीही शहरात ड्रग्जची विक्री जोरात...
पुणे पोलिसांकडून या कारवायांसह एरवी किरकोळ कारवाया सतत सुरू असतात. शनिवारी एमडीची विक्री करण्यासाठी आलेल्या २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणाला खराडी परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून चार लाख ६३ हजार ६०० रुपयांचे २३ ग्रॅम १८ मिलिग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. यावरून ड्रग्जचे जाळे किती खोलवर पसरले आहे, हे सिद्ध होते. त्यानुसार पोलिस आजही ड्रग्जला पूर्णपणे रोखण्यात कमी पडत असल्याचे दिसून येते.