स्वारगेट येथील जेधे चौकात निखळले पीएमपी बसचे चाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 21:01 IST2019-11-16T21:00:06+5:302019-11-16T21:01:55+5:30
पुन्हा एकदा पीएमपीच्या जुन्या बसच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण

स्वारगेट येथील जेधे चौकात निखळले पीएमपी बसचे चाक
पुणे : सातत्याने वर्दळ असलेल्या स्वारगेट येथील जेधे चौकात शनिवारी सकाळी पीएमपी बसचे चाक निखळले. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने चाक बसजवळच पडले. त्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही. ही बस १२ वर्षांपुर्वीची असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. परिणामी, पुन्हा एकदा पीएमपीच्या जुन्या बसच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या ताफ्यामधील शेकडो बस १२ वर्षांपुढील आहेत. मागील काही महिन्यांत नवीन बस आल्याने पीएमपीकडून जुन्या बस भंगारात काढल्या जात आहेत. मात्र, अजूनही अपेक्षित बस उपलब्ध होत नसल्याने जुन्या बस मार्गावर धावतच आहेत. त्यामुळे या बसचे ब्रेकडाऊन, आग लागणे, चाक निखळण्याचे प्रकार घडतात. काही महिन्यांपुर्वीच नेहरू रस्त्यावर बसचे पुढचे डाव्या बाजूचे चाक निखळले होते. त्यानंतर आता सर्वाधिक वर्दळीच जेधे चौकातच चाक निखळल्याची घटना घडली. मार्केटयार्ड आगाराची बस जेधे चौकात आल्यानंतर पुढील उजव्या बाजूचे चाक बसपासून वेगळे झाले. दोन बेअरींगला जोडणारा ‘कास्टींग पीस’ तुटल्याने हा प्रकार घडला. यावेळी बसचा वेग मर्यादीत होता. त्यामुळे चाक तुटून जवळच पडले. यावेळी बसमध्ये प्रवासी नव्हते. पीएमपी प्रशासनाकडून अर्धा-पाऊण तासात ही बस दुरूस्त करून आगारात नेण्यात आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.
‘पीएमपी’च्या ताफ्यामध्ये असलेल्या जुन्या बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण अधिक आहेत. काही बस १२ वर्षांपुढील असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. शनिवारी चाक निखळलेली बसही १२ वर्षांपुढील आहे. ताफ्यात नवीन बस दाखल होत असल्या तरी अद्याप पुरेसे प्रमाण नसल्याने जुन्या बस मार्गावर आणल्या जात आहेत. या बसची देखभाल-दुरूस्ती करण्यातही अडचणी निर्माण होतात. त्यांचे सुट्टे भाग मिळत नाहीत. त्यामुळे तात्पुरती दुरूस्ती करून बस मार्गावर सोडाव्या लागत आहेत.
---------------