मोदींना पंतप्रधान बनवून तुम्हाला काय मिळणार? याचे आधी उत्तर द्या - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 20:25 IST2024-01-16T20:25:37+5:302024-01-16T20:25:52+5:30
भाजपच्या ३८ खासदारांपैकी एकानेही शेतक-यांच्या, व्यापा-यांच्या समस्या, कांदा, दुध दर अथवा सामान्यांच्या अधिकारांबाबत आवाज उठवला का?

मोदींना पंतप्रधान बनवून तुम्हाला काय मिळणार? याचे आधी उत्तर द्या - सुप्रिया सुळे
इंदापूर : नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्याचा चंग बांधलेल्या लोकांनी, सामान्यांच्या पदरात काय, पडणार आहे याचे उत्तर आधी द्यावे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. शहरातील व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. इंदापूर शहर व्शायापारी संघाचे अध्यक्ष भरत शहा या वेळी उपस्थित होते. शासकीय विश्रामगृहात हा मेळावा झाला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, काहीतरी बदल घडेल असे वाटल्याने मागील काळात व्यापारी वर्गाने सर्वाधिक ताकद भाजपला दिली. मात्र ऑनलाईन व्यापार व कर लादून भाजपने व्यापा-यांचे नुकसान केले आहे. देशात आपल्याला विरोधकच नको असे भाजपला वाटते. ४८ खासदारांपैकी ३८ खासदार भाजपचे व त्यांच्या मित्रपक्षांचे आहेत. मात्र त्यातील एकानेही शेतक-यांच्या, व्यापा-यांच्या समस्या, कांदा, दुध दर अथवा सामान्यांच्या अधिकारांबाबत आवाज उठवला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आम्ही मोदींना पंतप्रधान बनवणार आहोत असे काही लोक म्हणतात. मोदींना पंतप्रधान बनवून तुम्हाला काय मिळणार आहे. तुम्हाला गुंडाळून ठेवतील. काय होतंय ते कळणार ही नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहका-याच्या दाओस दौ-यावर ही त्यांनी खरमरीत टीका केली. त्या म्हणाल्या की, परदेशात गुंतवणूक करण्यासाठी जातातच. मुख्यमंत्री, त्यांचा एखादा सचिव व गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित असे चारचौघे गेले तर ठीक झाले असते. परंतु एकदम ४७ जण गेले आहेत. ३५ कोटी परदेशवारीला वाया घालवायचे की अंगणवाडी सेविकांना द्यायचे हे तुम्हीच ठरवा. हा विरोधाला विरोध नाही, त्यांच्या धोरणाला विरोध आहे, असे सुळे यांनी स्पष्ट केले.