काय म्हणावं आता! पेनात डिव्हाइस, अंडरवेअरमध्ये मोबाइल; कॉपीबहाद्दरास अटक
By विवेक भुसे | Updated: July 2, 2023 15:37 IST2023-07-02T15:37:03+5:302023-07-02T15:37:16+5:30
लेखी परीक्षेत एका उमेदवाराने चक्क अंडरवेअरमध्ये मोबाईल ठेवून पेनाच्या कॅपमध्ये डिव्हाईस ठेवून कॉपी करण्याचा प्रयत्न केला

काय म्हणावं आता! पेनात डिव्हाइस, अंडरवेअरमध्ये मोबाइल; कॉपीबहाद्दरास अटक
पुणे : बॉर्डर रोड ऑगनायझेशनच्या लेखी परीक्षेत एका उमेदवाराने चक्क अंडरवेअरमध्ये मोबाईल ठेवून पेनाच्या कॅपमध्ये डिव्हाईस ठेवून कॉपी करण्याचा प्रयत्न करताना मिळून आला.
दिपचंद करमबीर (वय २५, रा. बरवाला, जि. हिस्सार, हरियाना) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी सहायक प्रशासन अधिकारी अरुण कुमार यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार धानोरी येथील बी आर ओ स्कुल ॲन्ड सेंटर येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रीफ, बाॅर्डर रोड ऑरगनायझेशनची व्हेईकल मेकॅनिक या पदासाठी लेखी परीक्षा सकाळी साडेदहा ते दीड दरम्यान होती. परीक्षेला उमेदवारांची तपासणी करुन सोडण्यात आले होते. परीक्षा सुरु झाल्यानंतर दिपचंद हा सारखा खाली पहात होता. त्यामुळे त्या वर्गावर सुपरवायझर असलेले मेजर एस के. साहु यांनी त्याच्यावर संशय आला. त्याची पुन्हा तपासणी केली. तेव्हा त्याच्याजवळच्या पेनच्या कॅपमध्ये डिव्हाईस मिळाला. आणखी तपासणी केल्यावर त्याने अंडरवेअरमध्ये मोबाईल लपविला असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध पुढील कारवाईसाठी फिर्यादी यांच्या हवाली केले. विश्रांतवाडी पोलिसांनी त्याला अटक केली असून सहायक पोलिस निरीक्षक एस एस माळी तपास करीत आहेत.