वानवडी : भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरची धडक बसून फुटबॉलपटू तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना महंमदवाडी हद्दीतील क्लाउड ९ परिसरात रविवारी (दि.५) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. आरीझ शेख (वय १९, रा. कुमार पाल्मग्रोव्ह, पारगेनगर, कोंढवा), असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून, टँकर चालक रवींद्र भीमराव दनाने (वय ३४) यास पोलिसांनीअटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरीझने नुकतीच १२ वीची परीक्षा दिली होती. काही दिवस तो परिवारासोबत केरळला फिरायला गेला होता. केरळवरून तो रविवारी आला होता. सायंकाळी तो मित्राला भेटण्यासाठी दुचाकी घेऊन घराबाहेर पडला. महंमदवाडी हद्दीतील क्लाउड ९ या सोसायटी परिसरात आल्यावर भरधाव असलेल्या पाण्याच्या टँकरने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली व तो रस्त्यावर पडला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या आरीझला तातडीने वानवडी येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरीझ हा फुटबॉल खेळाडू होता. तो राष्ट्रीय स्थरावर फुटबॉल खेळला असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. काळेपडळ पोलिसांनी टँकर चालक रवींद्र भीमराव दनाने (वय ३४) याला अटक केली असून, त्याने मद्यपान केल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.