उन्हाळयात हौशेपोटी पोहायला गेले अन् जीव गमावून बसले; भीमा नदीत बुडून २ मुलांचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 06:39 PM2023-05-21T18:39:20+5:302023-05-21T18:39:52+5:30
पाण्यात बुडालेल्या दोघांचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागला नाही, घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील भीमा नदीच्या पाण्यामध्ये आज काही मुले पोहण्यासाठी गेले असताना दोन मुले पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. अनुराग विजय मांदळे व गौरव गुरुलिंग स्वामी असे बुडालेल्या युवकांची नावे आहेत.
कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील भीमा नदीच्या पाण्यामध्ये आज सकाळच्या सुमारास काही मुले पोहण्यासाठी गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास मुले पोहत असताना दोघा मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाली. यावेळी अन्य मुलांनी आरडाओरडा केल्याने शेजारी शेतात काम करणारे तानाजी ढेरंगे हे नदीकाठी धावत आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात यांना देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस हवालदार मंगेश लांडगे, अमोल रासकर यांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरु केले. यावेळी पुणे महानगर विकास प्राधिकरणचे अग्नीशमक दलाचे केंद्र अधिकारीही आले होते. त्यांनतर पाण्यामध्ये बुडालेल्या दोघा मुलांचा शोध घेतला मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या दोघा मुलांचा शोध लागला नाही. या घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.