Shirur: सकाळी ६ वाजता बाहेर पडल्या; बिबट्याने उसाच्या शेतात फरफटत नेले, महिलेचा मृत्यू, आठवड्यात दुसरा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 16:04 IST2025-10-22T16:04:30+5:302025-10-22T16:04:56+5:30
सकाळी ६ वाजल्याच्या सुमारास लघुशंकेसाठी घराबाहेर पडल्या होत्या. शेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर क्रूर हल्ला करत जवळच उसाच्या शेतामध्ये फरपटत नेले

Shirur: सकाळी ६ वाजता बाहेर पडल्या; बिबट्याने उसाच्या शेतात फरफटत नेले, महिलेचा मृत्यू, आठवड्यात दुसरा बळी
शिरूर : जांबुत ता.शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत झाला. यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. भागुबाई जाधव या महिलेचे नाव आहे. दिनांक 22 रोजी सकाळी सहा वाजल्याच्या सुमारास लघुशंकेसाठी घराबाहेर पडल्या होत्या. शेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर क्रूर हल्ला करत जवळच उसाच्या शेतामध्ये फरपटत नेले. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात पिंपरखेड येथे पाच वर्षाची चिमुकली बिबट्याचे भक्ष ठरली. त्या ठिकाणापासून आजच्या झालेल्या हल्ल्याचे ठिकाण काही अंतरावरच आहे. एकाच परिसरात वारंवार हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने जरी तीन व्यक्तींना जर बंद केले असले तरी देखील परिसरात बिबट्यांची अद्यापही खूप मोठी संख्या दिसून येत आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वन विभागाच्या सध्याच्या उपाययोजनांवर नागरिकांनी कठोर व तीव्र शब्दात निषेध करत याच संतापातून कठोर निर्णय घेत जोपर्यंत जिल्हाधिकारी स्वतः घटनास्थळी येऊन बिबट्याच्या बंदोबस्त बाबतीत ठोस अहवाल देणार नाहीत. तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले. मानव बिबट्या संघर्ष किती तीव्र झाला आहे. हे या घटनेने स्पष्ट होत आहे. बिबट्याचा वाढता वावर, मानवी वस्तीत घुसखोरी यामुळे नागरिकांचे जीवन भयभीत झाले आहे. प्रशासन व वन विभागाने कठोर उपाय योजना करून बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. यावेळी शरद पवार गटाचे नेते देवदत्त निकम, माजी आमदार पोपटराव गावडे शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.