"आपण तुमच्या दोघांमधील भांडण मिटवू", असे सांगून जावयाला केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 15:59 IST2021-04-07T15:58:29+5:302021-04-07T15:59:34+5:30

सासू - सासरे यांच्यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

"We'll settle the quarrel between the two of you," he said | "आपण तुमच्या दोघांमधील भांडण मिटवू", असे सांगून जावयाला केली मारहाण

"आपण तुमच्या दोघांमधील भांडण मिटवू", असे सांगून जावयाला केली मारहाण

ठळक मुद्देमारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी

पिंपरी: पती आणि पत्नीचा वाद मिटवण्यासाठी बोलावलेल्या जावयाला मारहाण केल्याप्रकरणी पत्नी, सासू व सासरे यांच्यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदगुरुनगर, भोसरी येथे रविवारी रात्री ही घटना घडली.

गणेश अरुण आढाव (वय २७, रा. संत तुकाराम नगर) असे मारहाण झालेल्या जावयाचे नाव आहे. त्यांनी याबाबत मंगळवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सासरे संतोष चौधरी, चुलत सासरे बापू चौधरी, आजे सासरे दादा चौधरी, बाळू भोसले, पत्नी मोहीन चौधरी (वय १९), सासू सुवर्णा संतोष चौधरी (सर्व रा. सदगुरूनगर, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण मुलीच्या नांदण्याबाबतचे प्रकरण मिटवून घेऊ. तुम्ही सासरी या, असे म्हणून सासूने जावयाला बोलावून घेतले. जावई, त्याचे वडील आणि भाचा असे तिघेजण सासरी गेले. जावई दारात येताच सास-याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तुम्ही आम्हाला मिटवायल की भांडायला बोलावले आहे, असे विचारले असता आरोपींनी जावयाला शिवीगाळ केली. चुलत सास-याने जावयाच्या वडिलांना काठीने मारून जखमी केले. जावयाच्या भाच्याला देखील मारहाण केली. तुम्ही आमच्या मुलीला व्यवस्थित नांदवत नाही, असे म्हणत हाताने व बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

Web Title: "We'll settle the quarrel between the two of you," he said