Weather Update : सुखद वार्ता! देशात यंदा सरासरीच्या १०१ टक्के पाऊस पडणार : हवामान विभागाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 04:04 PM2021-06-01T16:04:30+5:302021-06-01T16:20:08+5:30

दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कमी पावसाची शक्यता....

Weather Update : Good News! The Indian Meteorological Department has revised guess of 101 percent rainfall this year | Weather Update : सुखद वार्ता! देशात यंदा सरासरीच्या १०१ टक्के पाऊस पडणार : हवामान विभागाचा अंदाज

Weather Update : सुखद वार्ता! देशात यंदा सरासरीच्या १०१ टक्के पाऊस पडणार : हवामान विभागाचा अंदाज

googlenewsNext

पुणे : भारतीयहवामान विभागाने आपला दुसरा सुधारित अंदाज मंगळवारी जाहीर केला असून त्यानुसार देशभरात जून ते सप्टेंबर या कालावधीत १०१ टक्के पावसाची शक्यता आहे. यावेळी प्रथमच देशातील ३६ हवामान विभागातील पावसाचे प्रमाण कसे असेल, याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार कोकणात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता आहे. त्याचवेळी  मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने एका वर्च्युअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती दिली. 

प्रशांत महासागरात ला लिना स्थिती तयार झाल्याने त्याचा फायदा नैऋत्यु मॉन्सूनला होणार आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

यंदा सरासरीच्या १०१ टक्के पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यात ४ टक्के कमी अथवा अधिक फरक गृहित धरण्यात आला आहे. त्याचबरोबर वायव्य भारतात (९२ ते १०८टक्के) सर्वसाधारण, दक्षिण द्वीपकल्प मध्ये (९३ ते १०७ टक्के) साधारण पाऊस असेल, तर उत्तर पूर्व भारत (९५ टक्क्यांहून कमी) सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्तता आहे. मध्य भारतात (१०६टक्क्यांहून अधिक) सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

भाग                पावसाची टक्केवारी       शक्यता टक्के

दुष्काळ                ९० टक्क्यांपेक्षा कमी          ८

सरासरीपेक्षा कमी   ९० ते ९६ १८

सर्वसाधारण              ९६ ते १०४                 ४०

सरासरीपेक्षा जास्त     १०४ ते ११०               २२

खुप जास्त               ११० पेक्षा अधिक        १२

.........

मल्टी मॉडेल नुसार यंदा जूनमध्ये देशभरात पावसाचे प्रमाण हे सर्वसाधारण असणार आहे. जूनमध्ये मध्य भारतातील पूर्वेकडील भाग, हिमालय परिसर, आणि पूर्व भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी वायव्य भारताचा बहुतांश भाग, दक्षिण भारत आणि उत्तरपूर्व भारतात अनेक ठिकाणी कमी पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज जून महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येणार आहे. 

......

कोअर झोनमध्ये १०६ टक्के पाऊस

भारताच्या दृष्टीने शेतीचे क्षेत्र व त्या ठिकाणी पडणारा पाऊस अतिशय महत्वाचे ठरते. त्यादृष्टीने हवामान विभागाने यंदा प्रामुख्याने शेती क्षेत्राचा समावेश असलेल्या कोअर झोन निश्चित केला आहे. त्या ठिकाणी १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी वेगळा अंदाज जाहीर करणार आहे.

........

कोकण, पूर्व विदर्भात जूनमध्ये अधिक पाऊस

हवामान विभागाने यंदा प्रथमच हवामान विभागानुसार अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार कोकण, आणि पूर्व विदर्भात जून महिन्यात सरासरीच्या तुुलनेत अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असणार आहे. 

......

मॉन्सून यंदा उशिरा येणार

सध्या केरळमध्ये पाऊस पडत असला तरी मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन झाले हे जाहीर करण्यासाठी आवश्यक असलेले पाऊसमान, वार्‍यांची दिशा हे निकष पूर्ण झालेले नाही. त्यामुळे यंदा मॉन्सूनला उशीर होण्याची शक्यता असून ३ जूनपर्यंत मॉन्सून केरळमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याबरोबर केरळमध्ये मॉन्सून आल्यानंतर हवामानाची स्थिती लक्षात घेऊन पुढील पाच दिवसात मॉन्सूनची वाटचाल कशी राहील हे जाहीर केले जाते. त्यामुळे केरळनंतरही मॉन्सूनची पुढील वाटचाल ही उशिरा राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Web Title: Weather Update : Good News! The Indian Meteorological Department has revised guess of 101 percent rainfall this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.