आमचा संबंध नाही; काही जणांकडून गुन्हेगारी घटनांना भाजपचा पाठिंबा असल्याचा अपप्रचार - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 16:41 IST2025-11-07T16:40:14+5:302025-11-07T16:41:21+5:30
चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर कोणी पोलिसांवर दबाब टाकत असतील, तर त्यांची गय करु नका

आमचा संबंध नाही; काही जणांकडून गुन्हेगारी घटनांना भाजपचा पाठिंबा असल्याचा अपप्रचार - चंद्रकांत पाटील
पुणे: शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे शहराचे नाव बदनाम होत आहे. काहीजण गुन्हेगारी घटनांना भाजपचा पाठिंबा असल्याचा अपप्रचार करत आहेत. राजकीय हेतूने प्रेरित आरोप करुन शहराचे नाव बदनाम करू नये. आमचा कोणत्याही गुन्हेगाराशी संबंध नाही, भाजप गुंडांना पाठिंबा देणारा पक्ष नाही’, असे स्पष्ट उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ‘चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर कोणी पोलिसांवर दबाब टाकत असतील, तर त्यांची गय करु नका. कोणत्याही परिस्थितीत पुण्यातील गुन्हेगारीचा बीमोड करावा’, अशी सूचना पाटील यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना केली.
शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी (दि. ७) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पोलिस आयुक्तालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘कोथरूडमधील गुंड नीलेश घायवळ प्रकरणात चंद्रकांत पाटील तसेच जैन बोर्डिंग प्रकरणात आमचे नाव जोडून काहीजण त्याचा राजकीय फायदा घेत आहेत. कोणतेही पुरावे नसताना थेट आरोप करणे चुकीचे आहे’, असे पाटील यांनी नमूद केले.
पाटील म्हणाले, ‘कोथरूड गोळीबार प्रकरणात घायवळ परदेशात पसार होणे, त्याला मिळालेला पासपोर्ट अशा घटनांसाठी आमचा संबंध जोडून बदनामीचे प्रयत्न होताहेत. पुणे शहराचा विस्तार वाढत असताना अशा प्रकारांमुळे पुण्याचे नाव बदनाम होत आहे. अशा प्रकारांमुळे शहराच्या विकासावर परिणाम होत आहे.’ कोथरूडमध्ये दोन गटात नुकताच वाद झाला. याप्रकरणात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूडमधील जातीय तणावावर पोलिसांनी लक्ष ठेवावे. असे प्रकार योग्य नाहीत’, असेही पाटील म्हणाले.
पार्थ पवार प्रकरणी बोलणे टाळले
पार्थ पवार यांच्या अमोडिया एंटरप्रायजेस एलएलपी कंपनीकडून झालेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पत्रकारांनी पाटील आणि मोहोळ यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला. तेव्हा पाटील यांनी त्यावर बोलणे टाळत, गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांशी चर्चा केल्याचे सांगितले.
गुंडांची बेनामी संपत्ती जप्त करा
पाटील म्हणाले, दररोज भेटणाऱ्यांपैकी काहींसोबत अनावधानाने फोटो घेतले जातात. याचा अर्थ त्यांच्याशी संबंध जोडणे योग्य नाही. पोलिसांनी कोण, कुठून पैसा कमवतो हे तपासावे. त्यांची संपत्ती वाढल्यास ईडीकडे तक्रार करावी. येत्या आठवड्यात पोलिस गुन्हेगारांची ईडीकडे तक्रार करतील. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना वारंवार पोलिस ठाण्यात बोलवा. त्यांना अटक होत नसेल तर, दिवसभर बसवून ठेवा. मानसिक दबाव निर्माण करा. त्याचबरोबर पोलिसांनी सोशल मीडियावर सक्रिय राहावे आणि माध्यमांशी सातत्याने संवाद साधावा.
धंगेकरांवर थेट निशाणा
नीलेश घायवळ आणि माझे संबंध असल्याचे पुरावे कोणाकडे आहेत? धंगेकर फक्त बोलतात. मी मंत्री असताना केलेले आरोप माझ्या अब्रूला धक्का देणारे आहेत. माझ्या विरोधात एकही ठोस पुरावा नाही, पण माध्यमे तरीही बातम्या चालवतात, अशी टीका पाटील यांनी केली. ते म्हणाले, धंगेकरांच्या विरोधात गणेश बिडकर यांनी दिलेले पुरावे कुणी दाखवले नाहीत. माझ्यावर पुरावा नसताना चर्चा केली जाते. शहराची बदनामी करणे योग्य नाही. एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले संबंध स्पष्ट करताना पाटील म्हणाले, शिंदे माझे परममित्र आहेत. सर्व प्रश्न अशा प्रकारे सुटत नाहीत. अल्पवयीन आरोपींच्या वयोमर्यादेबाबत बोलताना, गुन्हेगारांचे वय कमी करण्याचा अधिकार केंद्राकडे आहे. लवकरच केंद्राकडे विनंती करू, असेही पाटील म्हणाले.