'तुला आम्ही शेवटची वॉर्निंग देतो', धमकी देणाऱ्या पुण्यातील शिवसेना नगरसेवकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 15:45 IST2022-06-26T15:44:34+5:302022-06-26T15:45:39+5:30
शिवसेनेचे मावळते नगरसेवक बाळा ओसवाल यांच्यासह चौघांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

'तुला आम्ही शेवटची वॉर्निंग देतो', धमकी देणाऱ्या पुण्यातील शिवसेना नगरसेवकावर गुन्हा दाखल
पुणे : जागेच्या वादातून मारहाण करुन जखमी करुन तुझा जीव महत्वाचा नाही का अशी धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे मावळते नगरसेवक बाळा ओसवाल यांच्यासह चौघांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढवा -बिबवेवाडी येथील गंगाधाम रोडवरील चिंतामणी ट्रान्सपोर्टच्या शेजारील जागेवर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता घडला.
याप्रकरणी सुषमा सुनिल रिठे (वय ३२, रा. गंगाधाम रोड, बिबवेवाडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन सुमित तेंलग, शाहजी रणदिवे, सुकेशनी ऊर्फ राणी बनसोडे, नगरसेवक बाळा ओसवाल यांच्यावर कलम ३२४, ५०४, ५०६, ३३ खाली गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व्हे नं. ६५६/०९/०१/०१ येथे असणारी जागा ही फिर्यादीचे पती व दीर यांनी खरेदी केलेली आहे. ही जागा सुमित तेंलग यांचे वडिल दिलीप तेंलग ह्याच्या मालकीची असल्याचे सांगून या जागेच्या वादातून फिर्यादी व त्यांची बहीण निलीमा व आई मुक्ता सखाराम कांबळे हे जागेवर गेले होते. तेथे सुमित तेंगल, शाहजी रणदिवे, सुकेशनी बनसोडे यांनी लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. सुमित याने फिर्यादी सुषमा रिठे यांचे डोके घराच्या भिंतीवर आपटून जखमी केले. बाळा ओसवाल हे त्या ठिकाणी आले. त्यांनी तुला तुझा जीव महत्वाचा नाही का आता तरी जागेचा विषय सोडून टाक, इथून निघून जा. ही जागा मी घेतली आहे. ३० लाख रुपयांला घेतली आहे. ही लोकही माझी आहेत, तुला आम्ही शेवटची वॉर्निंग देतो, निघ आता मरणार तुम्ही अशी धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत.