Pune Water Supply: संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 10:33 IST2025-11-18T10:32:56+5:302025-11-18T10:33:08+5:30
देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी धरणातून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा गुरुवारी सकाळी ६ ते रात्री १२ बंद ठेवावा लागणार आहे.

Pune Water Supply: संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
पुणे : विविध जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्ती, फ्लो मीटर बसवणे, व्हॉल्व्ह बसवणे आदी कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी (२० नोव्हेंबर) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत ३००० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. खडकवासला धरणातून दोन १४०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी ३००० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला जोडण्यात आले आहेत. खडकवासला ते पर्वती ३००० मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील फ्लो मीटर बसविणे व १४०० मिलीमीटर वाहिनीवरील बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविणे याकरिता १४०० मिलीमीटर व्यासाचे व्हॉल्व्ह पूर्ण बंद होत आहेत, याच्या तपासणीसाठी व वडगाव जलशुद्धीकरण फेज २ ची क्षमता वाढविण्यासाठी नवीन संपवेल टाकीच्या भिंतीला कोअर कटिंग करण्यासाठी तसेच इतर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी धरणातून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा गुरुवारी सकाळी ६ ते रात्री १२ बंद ठेवावा लागणार आहे.
नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र (५०० एमएलडी), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर व पर्वती एलएलआर टाकी परिसर, पर्वती टँकर पॉइंट, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारितील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, शिवणे इंडस्ट्रीज परिसर, एसएनडीटी एचएलआर टाकी व एमएलआर टाकी परिसर, चतु:श्रुंगी टाकी परिसर, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. १ व २, गणपती माथा, जुने वारजे जलकेंद्र व नव्याने समाविष्ट गावे बूस्टर पंपिंग अंतर्गत येणारा परिसर येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.