Pune Rain: पाटील इस्टेटमधील ६०० कचरा वेचकांच्या घरात शिरले पाणी; पुढील २ दिवस सेवेत व्यत्यय येण्याची शक्यता
By नम्रता फडणीस | Updated: July 25, 2024 18:16 IST2024-07-25T18:14:43+5:302024-07-25T18:16:11+5:30
प्रशासनाच्या सूचनांनुसार कचरा वेचकांचे सुरक्षेच्या कारणास्तव आपत्कालीन पुनर्वसन व स्थलांतर करावे लागण्याची वेळ आली

Pune Rain: पाटील इस्टेटमधील ६०० कचरा वेचकांच्या घरात शिरले पाणी; पुढील २ दिवस सेवेत व्यत्यय येण्याची शक्यता
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक भागातील सोसायटयांमध्ये पाणी शिरले आहे. रोज सकाळी घरोघरी जाऊन कचरा वेचणा-या कुटुंबांची घरेही त्याला अपवाद ठरली नाहीत. शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट वस्ती मध्ये राहाणा-या कचरावेचकांच्या वस्ती आणि घरांमध्ये देखील पाणी शिरले आहे. त्यातील निम्याहून अधिक कचरा वेचकांचे आपत्कालीन स्थलांतर जवळपासच्या शाळांमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे शहरास कोणत्याही परिस्थितीत दररोज दारोदारी कचरा संकलन सेवा देणाऱ्या 'स्वच्छ' कचरा वेचकांच्या सेवेत पुढील दोन दिवस व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील सखल भागातील कचरा वेचकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. वस्तीत सर्वत्र पाण्याचे साम्राज्य होते. या वस्तीत जवळपास ६०० कचरावेचक राहतात. घरात पाणी शिरल्याने बहुतांश कचरावेचक कचरा संकलन करण्यासाठी जाऊ शकले नाहीत. घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील सामान बाहेर काढण्याच्या कामात सर्व गुंतले होते. प्रशासनाच्या सूचनांनुसार कचरा वेचकांचे सुरक्षेच्या कारणास्तव आपत्कालीन पुनर्वसन व स्थलांतर करावे लागण्याची वेळ आली आहे. या कारणास्तव 'स्वच्छ' कचरा वेचकांच्या सेवेत व्यत्यय येण्याची शक्यता आहे. या काळात आपल्या दारी दररोज कचरा घेण्यासाठी येणारे कचरा वेचक पुढील २ दिवस येऊ न शकल्यास कृपया त्यांना सहकार्य करावे व त्यांना गरज असल्यास थेट मदत करून कचरा वेचकांप्रती बांधिलकी जपावी असे आवाहन स्वच्छ संस्थेने केले आहे.