नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाणीपातळीत वाढ; चार धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 17:38 IST2025-07-27T17:38:32+5:302025-07-27T17:38:59+5:30

पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा दिला असून, पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात बदल होऊ शकतो, असे स्पष्ट केले आहे.

Water level rises in Nira river catchment area; Large discharge from four dams | नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाणीपातळीत वाढ; चार धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग

नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाणीपातळीत वाढ; चार धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग

नीरा : नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने नीरा खोऱ्यातील चार प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे भाटघर, नीरा देवधर, वीर आणि गुंजवणी या धरणांतून नीरा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा दिला असून, पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात बदल होऊ शकतो, असे स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवड्यात पावसाने उसंत घेतल्याने वीर धरणातून विसर्ग बंद करण्यात आला होता. मात्र, गुरुवारपासून (दि. २४ जुलै) पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने नीरा खोऱ्यातील चार धरणांमध्ये एकूण २,९४१ टीएमसी पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे शनिवारी (दि. २६ जुलै) दुपारी २.३० वाजल्यापासून वीर धरणातून ५,३१८ क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला होता. आज, रविवारी (दि. २७ जुलै) सकाळी ६ वाजल्यापासून हा विसर्ग वाढवून १४,४९६ क्युसेक्स इतका करण्यात आला आहे.

नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा -

नीरा नदीच्या दोन्ही तीरांवरील गावांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. पावसाचे प्रमाण आणि धरणांमधील पाण्याची आवक लक्षात घेता, विसर्गात कोणत्याही क्षणी वाढ किंवा घट होऊ शकते. यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी नदीपात्रात जाणे टाळावे आणि आवश्यक खबरदारी घ्यावी, असे विभागाने नमूद केले आहे.

नीरा नदीचा दुथडी प्रवाह -

वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. वीर धरणाच्या तीन सांडव्यातून १४,४९६ क्युसेक्सने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. यामुळे नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून, नदीकाठच्या परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्थानिकांचे मत -

स्थानिक शेतकरी आणि रहिवासी यांनी पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात झालेली वाढ स्वागतार्ह असल्याचे म्हटले आहे. मात्र, विसर्गामुळे नदीकाठच्या शेती आणि घरांना धोका निर्माण होऊ शकतो, याबाबतही चिंता व्यक्त केली आहे. पाटबंधारे विभागाने वेळोवेळी माहिती देण्याचे आणि योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 

पुढील काळातील उपाययोजना -

पाटबंधारे विभागाने पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग नियंत्रित करण्याचे नियोजन केले आहे. येत्या काही दिवसांत पाऊस कमी झाल्यास विसर्गाचे प्रमाण कमी केले जाईल, असे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तूर्तास, नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा कायम आहे.

भाटघर धरण : या धरणात ९५.८८ टक्के पाणीसाठा आहे. सकाळी १० वाजल्यापासून अस्वयंचलित द्वारांतून ४,००० क्युसेक्स आणि विद्युत निर्मिती केंद्रातून १,६३१ क्युसेक्स, असा एकूण ५,६३१ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.

नीरा देवधर धरण : ८६.५४ टक्के पाणीसाठ्यासह, सकाळी १० वाजल्यापासून ४,१३० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.

गुंजवणी धरण : ७५.५२ टक्के पाणीसाठ्यासह, सकाळी ६ वाजल्यापासून २५० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.

वीर धरण : ९५.३२ टक्के पाणीसाठ्यासह, सकाळी ६ वाजल्यापासून १४,४९६ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.

धरणांचा पाणीसाठा आणि क्षमता धरण - एकूण क्षमता (टीएमसी) - आजचा पाणीसाठा (टीएमसी) - टक्केवारी

भाटघर - २३,५०२ - २२,५३३ - ९५.८८

नीरा देवघर - ११,७२९ - १०,१५१ - ८६.५४

वीर - ९,४०८ - ८,९६८ - ९५.३२

गुंजवणी - ३,६९० - २,७८७ - ७५.५२

एकूण - ४८,३२९ - ४४,३७३ - ९१.८१

Web Title: Water level rises in Nira river catchment area; Large discharge from four dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.