जीबीएस रुग्ण असलेल्या परिसरातील पाणी शुद्ध; शासनाच्या प्रयोगशाळेचा अहवाल प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 10:47 IST2025-01-26T10:45:18+5:302025-01-26T10:47:49+5:30
या परिसरातील पाणी शुद्ध असून, पिण्यास योग्य आहे, असे राज्य शासनाच्या प्रयोगशाळेने स्पष्ट केले आहे

जीबीएस रुग्ण असलेल्या परिसरातील पाणी शुद्ध; शासनाच्या प्रयोगशाळेचा अहवाल प्रसिद्ध
- हिरा सरवदे
पुणे : शहरातील सर्वाधिक गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे रुग्ण असलेल्या सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याच्या तपासणीचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यात या परिसरातील पाणी शुद्ध असून, पिण्यास योग्य आहे, असे राज्य शासनाच्या प्रयोगशाळेने स्पष्ट केले आहे. या अहवालामुळे नागरिकांना काहीसा दिला मिळाला आहे. दुसरीकडे शहरातील न्यूरोलॉजिस्ट डाॅक्टरांनी मात्र, हा आजार दूषित पाणी आणि अन्नामुळे होत असल्याचा दावा केल्याने नागरिकांच्या मनातील संशय कल्लोळ बळावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात ‘जीबीएस’ आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी नांदेड येथील विहीर व अन्य ठिकाणची पाहणी केली होती. तसेच धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नऱ्हे, नांदेड या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांमधील पाण्याचे नमुने तपासण्याचे व ते राज्य शासनाच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे महापालिकेने ११ ठिकाणचे पाण्याचे प्रत्येकी १०० मिलिलिटर पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल पुणे महापालिकेला प्राप्त झाला आहे.
या अहवालानुसार किरकटवाडी येथील भैरवनाथनगर, उज्ज्वल निसर्ग सोसायटी, पंढरी निवास, ठकूबाई हगवणे निवास, आर. ओ. फिल्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन जवळ, सोनवणेवस्ती, नानानगर, डीएसके विश्व जवळील जलकुंभ या सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य आहे, तर कानडे इस्टेट नांदेड येथील विहिरीत साेडलेल्या खडकवासला धरणातून येणाऱ्या पाण्यात कोलीफॉर्म्स, थरमोटॉलरंट आणि ई कोलाय हे जिवाणू आढळून आल्याने हे पिण्यास योग्य नाही, मात्र, ब्लिचिंग पावडर टाकल्यानंतर हे पाणी पिण्यास योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
शासनाच्या अहवालानुसार महापालिकेच्या पाणवठ्यावरील पाणी शुद्ध असल्याचे नमूद केले आहे. तसेच महापालिकेने २७ ठिकाणांचे पाण्याचे नमुने घेतले होते, तेथील पाणी पिण्यास योग्य असल्याचेही महापालिकेच्या प्रयोगशाळेने कळविले आहे. - रामदास तारू, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका
जीबीएस आजार ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. हा आजार दूषित पाणी व अन्नामुळे होऊ शकतो. ही स्थिती अचानक विकसित होऊ शकते आणि चार आठवड्यांपर्यंत वाढू शकते. या संसर्गामुळे जुलाब आणि पोटदुखी यासारखी लक्षणेदेखील होऊ शकतात. मात्र योग्य उपचारांनी हा बरा होऊ शकतो. - डॉ. परेश बाबेल, न्यूरोलॉजिस्ट