Ward structure in Pune city must be changed! All party group leaders support Ajit Pawar's role | प्रभाग रचना बदलायलाच हवी! सर्वपक्षीय गटनेत्यांचा अजित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा

प्रभाग रचना बदलायलाच हवी! सर्वपक्षीय गटनेत्यांचा अजित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांच्या निश्चितीपासून प्रभाग रचनेच्या बदलापर्यंतच्या चर्चांना सध्या उधाण आलेले आहे. त्यातच पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी प्रभाग रचना बदलणार असल्याचे वक्तव्य पुण्यात केले. त्यानंतर, सर्वपक्षीय गटनेत्यांनी प्रभाग रचना बदलणे आवश्यक असून भारतीय जनता पक्षाने चुकीच्या पध्दतीने केलेल्या बदलामुळे विकासावर विपरीत परिणाम झाल्याचा सूर आळवला आहे.

राज्यामध्ये 2014 साली सत्ता बदल झाल्यानंतर महापालिकांच्या प्रभाग रचनेमध्ये बदल करण्यात आला होता. 2017 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हा बदल अंमलात आणला गेला. दोन वरुन चार सदस्यांवर गेलेल्या प्रभाग रचनेमुळे भाजपाला अपेक्षित यश मिळाले. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता गेली. कॉंग्रेस आणि शिवसेनेला तसेच मनसेलाही अपेक्षित  यश मिळाले नाही. चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीमुळे विकासकामांवर परिणाम झाल्याचे पहायला मिळाले. एकाच पक्षातल्या तसेच वेगवेगळ्या चारही नगरसेवकांमधील समन्वयाचा अभाव, स्पर्धा प्रकर्षाने जाणवत राहिली. विरोधी पक्षांकडून तर प्रभाग रचना बदलण्याची आणि चुकीच्या पद्धतीने झाल्याची टीका मागील तीन वर्षांपासूना सुरु आहे. पालकमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे या मागणीला जोर चढला आहे.
====
प्रभागाची रचना करताना सर्वसंमतीने केली जाते. खरेतर एक सदस्यिय प्रभाग असावा. एका नागरिकाला एक मत देण्याचा घटनात्मक अधिकार आहे. एक सदस्यीय प्रभाग असल्यास विकास कामे सुरळीत होतात. चार सदस्यीय पद्धतीमुळे विकास खुंटला. हा बदल करण्यासाठी राज्य शासन व पालिका योग्य ती पावले उचलेल. तसेच पालकमंत्री अजित पवार योग्य तो निर्णय घेतील.
- आबा बागुल, गटनेते, कॉंग्रेस
====
भाजपाने केलेला बदल हा चुकीचाच होता. पालिकेतील सत्ता बदल झाल्यापासून विकासकामेच झाली नाहीत. समाविष्ठ झालेल्या आणि नव्याने समाविष्ठ होणा-या गावांच्या विकासामध्ये त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या गावांना जोडणा-या प्रभागाच्या पायाभूत सुविधांवर ताण येत आहे. रचना बदलताना नगरसेवक आणि नागरिकांच्या हरकती-सूचनांचा गांभिर्याने विचार व्हावा. राष्ट्रवादीने भाजपासारखे सत्ता डोळ्यासमोर ठेवून रचना बदलली तर विकासाला पुन्हा खीळ बसेल.
- वसंत मोरे, गटनेते, मनसे
====
राष्ट्रवादीची पक्षीय भूमिका असू शकते. परंतू, प्रभाग रचनेत बदल केल्याने काम करणा-यांना फरक पडत नाही. लोकसंपर्क आणि चांगल्या कामाच्या जोरावरच निवडणुका जिंकता येतात. नागरिकांवर कामाचा प्रभाव असतो. त्यामुळे भाजपा नगरसेवकांनी केलेल्या कामामुळे कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. रचना बदलणे हा कामाला पर्याय असू शकत नाही.
- धीरज घाटे, सभागृह नेते, पुणे महानगर पालिका
====
चार सदस्यीय प्रभाग असल्याने चौघांच्या निधीमधून विकास कामे झपाट्याने झाली. हीच पद्धत कायम ठेवावी. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या काळात दोनचा प्रभाग केलाच ना. प्रभाग बदलाची सुरुवात याच पक्षांनी केली. बदलाला आम्ही घाबरत नाही. धमक असेल तर एकचा प्रभाग करुन दाखवावा.
- सुनिता वाडेकर, गटनेत्या, आरपीआय
====
भाजपाने सत्तेचा गैरवापर करुन प्रभाग रचना बदलली. परंतू, आता ही प्रभाग रचना बदलणे आवश्यक आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे कामांवर परिणाम झाला असून नागरिकांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत. राजकीय फायद्यापेक्षाही नागरिकांचा फायदा लक्षात घेऊन बदल होणे आवश्यक आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य असून शासन स्तरावर याबाबत योग्य ती कार्यवाही होईल.
- दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ward structure in Pune city must be changed! All party group leaders support Ajit Pawar's role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.