प्रभाग रचना भाजपच्या सोयीची; राष्ट्रवादी शरद पवार गट देणार न्यायालयात आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 18:03 IST2025-08-25T18:03:38+5:302025-08-25T18:03:52+5:30
महापालिका निवडणुकीसाठी पक्ष विधानसभा निवडणूक झाल्यापासून आक्रमक भूमिका घेत आहेत

प्रभाग रचना भाजपच्या सोयीची; राष्ट्रवादी शरद पवार गट देणार न्यायालयात आव्हान
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर महाविकास आघाडीबाबत त्वरित निर्णय घ्यावा, असे आवाहनही पक्षाच्या प्रदेश नेत्यांना करण्यात आला.
महापालिका निवडणुकीसाठी पक्ष विधानसभा निवडणूक झाल्यापासून आक्रमक भूमिका घेत आहे. त्यामुळेच प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर लगेचच पक्षनेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप तसेच माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, आमदार बापू पठारे, माजी आमदार जयदेव गायकवाड, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, श्रीकांत पाटील, विशाल तांबे, सचिन दोडके, उदय महाले, नितीन कदम, काका चव्हाण, नीलेश निकम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारूप प्रभाग रचनेवर सर्वच पदाधिकाऱ्यांनी टीका केली. शहराध्यक्ष जगताप तसेच माजी नगरसेवकांनी प्रभागनिहाय आढावा घेत प्रभाग कसे भारतीय जनता पक्षाला सोयीचे होतील, असे सांगितले. या रचनेला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित जबाबदारी माजी नगरसेवक विशाल तांबे यांना देण्यात आली. अन्य विरोधी पक्षांचे सहकार्य यासाठी घेण्यासंदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासही तांबे यांना सांगण्यात आले.
महाविकास आघाडीचा निर्णय प्रदेशातील नेत्यांनी त्वरित घ्यावा, अशी मागणी शहराध्यक्ष जगताप यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे जाहीरपणे केली होती; मात्र त्यावर पुढे काहीच हालचाल झाली नाही. या निर्णयाला विलंब झाला तर त्याचा थेट परिणाम संभाव्य उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते व एकूणच पक्षाच्या जिंकण्याच्या क्षमतेवर होतो. त्यामुळे या बैठकीतील निर्णय म्हणून पुन्हा एकदा प्रदेश नेत्यांना आघाडीसंबंधी काय ते कळवावे, असे आवाहन करण्याचे बैठकीत ठरले.