युद्धामुळे परदेशी पर्यटनास खीळ; भीतीमुळे युरोपलाही ब्रेक, दुबईसह आखातातील सहली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:00 IST2026-03-17T15:00:07+5:302026-03-17T15:00:18+5:30

नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीचा हंगाम संपत असतानाच अमेरिका-इराण संघर्षामुळे दहा-बारा दिवसांत दुबईसह अन्य आखाती देशांतील पर्यटन बुकिंग थांबले आहे

War disrupts foreign tourism; Fears cause a halt in Europe, trips to the Gulf including Dubai canceled | युद्धामुळे परदेशी पर्यटनास खीळ; भीतीमुळे युरोपलाही ब्रेक, दुबईसह आखातातील सहली रद्द

युद्धामुळे परदेशी पर्यटनास खीळ; भीतीमुळे युरोपलाही ब्रेक, दुबईसह आखातातील सहली रद्द

गोविंद बर्गे
 
पिंपरी
: आखाती युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता पिंपरी-चिंचवडमधील पर्यटन व्यवसायावरही दिसू लागला आहे. शहरातून दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक दुबईसह मध्यपूर्वेतील देशांत फिरायला जातात. मात्र, गेल्या दहा दिवसांत अनेकांनी बुकिंग रद्द केले. युद्धामुळे निर्माण झालेल्या भीतीमुळे युरोप पर्यटनालाही प्रतिसाद कमी मिळत असल्याची माहिती ट्रॅव्हल्स एजन्सीच्या प्रतिनिधींनी दिली.

शहरात परदेशी पर्यटनाचे नियोजन करणाऱ्या सुमारे ८० ते ९० मोठ्या ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत. लहान स्वरूपातील शंभरहून अधिक एजन्सी कार्यरत आहेत. शहरातील नागरिक परदेशी पर्यटनाला जातात. दुबई, अबूधाबी, कतार, ओमान, बहरीन आणि कुवेत या आखाती देशांना पर्यटकांची पसंती असते. या देशांमध्ये पर्यटनासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी योग्य मानला जातो. यंदा या कालावधीत चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र हंगाम संपत असतानाच अमेरिका-इराण संघर्षामुळे दहा-बारा दिवसांत दुबईसह अन्य आखाती देशांतील पर्यटन बुकिंग थांबले. मार्चमधील नियोजित दूर रद्द झाल्या आहेत.  युरोपातील टूरलाही शहरातून चांगली मागणी असते. मात्र आंतरराष्ट्रीय तणावामुळे अनेकांनी युरोप दौरे पुढे ढकलल्याचे ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सांगितले. 

सिंगापूरसह देशांतर्गत पर्यटन मात्र स्थिर

भूतान, नेपाळ, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि इंडोनेशिया या देशांसाठीचे बुकिंग मात्र सध्या स्थिर आहे. त्याचप्रमाणे गोवा, केरळ, हिमाचल प्रदेश, काश्मीर या देशांतर्गत पर्यटनस्थळांनाही पर्यटकांची मागणी कायम आहे.

दुबईतील आमचे पर्यटक सुरक्षित आहेत. युद्धामुळे दुबईच्या दोन टूर बुकिंग रद्द झाल्या. सध्या पर्यटकांचा कल श्रीलंका, इंडोनेशिया, सिंगापूर आणि थायलंडकडे वाढत आहे. - विकास भूजबळ, टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिक

गेल्या दहा दिवसांत दुबईसह मध्यपूर्वेतील ४०० बुकिंग रद्द झाल्या. युरोप टूरची चौकशीही घटली आहे. मात्र सिंगापूर, मलेशियासह देशांतर्गत पर्यटनावर सध्या परिणाम नाही. युद्ध लांबले आणि इंधन टंचाई वाढली तर पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे - नीलम मंडलिक,संचालिका, ट्रॅव्हल्स कंपनी, चिंचवड.

Web Title : युद्ध का विदेशी पर्यटन पर असर: डर से यूरोप, दुबई यात्राएं रद्द

Web Summary : पिंपरी-चिंचवड के पर्यटन क्षेत्र को झटका, युद्ध के डर से दुबई, मध्य पूर्व और यूरोप की यात्राएं रद्द। सिंगापुर और घरेलू पर्यटन स्थिर। संघर्ष जारी रहने पर अनिश्चितता।

Web Title : War Hits Foreign Tourism: Europe, Dubai Trips Canceled Due to Fear

Web Summary : Pimpri-Chinchwad's tourism sector faces setbacks as war fears lead to Dubai, Middle East, and Europe trip cancellations. Singapore and domestic tourism remain stable. Uncertainty looms if conflict persists.