जुळ्या मुलींच्या अपघाती निधनाने विश्रांतवाडी हळहळली, आईच्या डोळ्यादेखत पोटच्या गोळ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 02:07 PM2023-10-17T14:07:58+5:302023-10-17T14:08:09+5:30

टॅंकरचालकाच्या बेसावधपणामुळे ४ वर्षांच्या मुलींनी गमावला जीव, चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Vishrantwadi shocked by the accidental death of twin girls, the death of stomach bullets in front of the mother | जुळ्या मुलींच्या अपघाती निधनाने विश्रांतवाडी हळहळली, आईच्या डोळ्यादेखत पोटच्या गोळ्यांचा मृत्यू

जुळ्या मुलींच्या अपघाती निधनाने विश्रांतवाडी हळहळली, आईच्या डोळ्यादेखत पोटच्या गोळ्यांचा मृत्यू

लोहगाव: सोमवारची सांजवेळ, सायंकाळचे ४.३० वाजलेले, वाहतुकीने नेहमीप्रमाणे गजबजलेला विश्रांतवाडी चौक, आई वडील आपल्या जुळ्या मुलींना शास्त्रीनगर येथील साई रूग्णालयात रूटीन चेकअपसाठी नेतात. तिकडून भोसरीकडे दुचाकीवरून परतताना विश्रांतवाडी चौकात लाल सिग्नल पडतो. दुचाकी सिग्नलवर थांबते. सिग्नल सुटताच दुचाकीचे ॲक्सीलेटर वाढते. तेवढ्यात मागून भरधाव येणारा टॅंकर त्या दुचाकीला जोरात धडकतो. दुचाकी आडवी होऊन पती पत्नी जुळ्या मुलींसहीत खाली पडतात.

 क्षणार्धात होत्याचे नव्हते होते, दुचाकी तिरकी होऊन सतीशकुमार दुचाकीवरून बाहेर फेकले जातात पत्नी व त्या दोन चिमुकल्या टॅंकरखाली येतात. त्या जुळ्या मुलींच्या डोक्यावरून टॅंकरचे मागील चाक जाते. व त्यात त्या दोन मुलींचा जागीच अंत होतो. पत्नीच्या पायावरून चाक गेल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडते. ही काळजाचा ठोका चुकवीणारी घटना बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्या त्या टॅंकरचालकामुळे घडते. खरंच मनुष्य किती बेसावध, बेजबाबदार असू शकतो ? याचा अंदाज या घटनेमुळे येतो. 

आई किरण झा (४०) या थोडक्यात बचावतात पण चाकाखाली उजवा पाय येऊन त्याही फ्रॅक्चर होतात. आई वडीलांच्या डोळ्यादेखत घडलेली मन सुन्न करणारी ही घटना पाहताच प्रत्यक्षदर्शींच्या पायाखालची जमीन सरकते व ते आक्रस्ताळपणे धावतात पण वेळ निघून गेलेली असते. पत्नी व मुली रक्ताच्या थारोळ्यात बघून सतीशकुमारांच्या काळजाचा मात्र ठोका चुकला असतो व ते हंबरडा फोडतच राहतात. स्थानिक विश्रांतवाडीतील रहिवाशांनी यावेळी एकच गर्दी केली व हा प्रसंग पाहून हळहळले. त्या टॅंकर चालकाला त्वरीत ताब्यात घेऊन सर्वांनी चोप दिला व विश्रांतवाडी पोलिसांच्या हवाली केले. पत्नी किरण हिस उपचारासाठी खाजगी रूग्णालयात भरती केले असून तिच्यावर पुढील उपचार सुरू आहे. 

बेजबाबदार, बेसावधपणे, असुरक्षित वाहन चालविणारा प्रमोदकुमार रामलाल यादव (२७) हा उत्तर प्रदेश प्रतापगड जिल्ह्यातील कोपा रहिवाशी. त्याने घाईत, बेसावध, बेजबाबदार व असुरक्षित वाहन चालविल्याने हा अपघात घडला. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले असून त्याचा बेजबाबदारपणा अधोरेखीत झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस एस माळी यांनी भादंवि ३०४ प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला असून गुन्हेचे पोनि भालचंद्र ढवळे पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे भोसरी गावात शोककळा पसरली आहे.

Web Title: Vishrantwadi shocked by the accidental death of twin girls, the death of stomach bullets in front of the mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.