वाळू माफियांविरोधात ग्रामस्थ संतप्त

By Admin | Updated: June 26, 2015 04:17 IST2015-06-26T04:17:36+5:302015-06-26T04:17:36+5:30

सातत्याने होणारा वाळू उपसा, तक्रारी करुनही महसुल विभागाने केलेले दुर्लक्ष यामुळे शेवटी वाळू माफियांना रोखण्यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन जुन्नर

The villagers are angry against sand mafia | वाळू माफियांविरोधात ग्रामस्थ संतप्त

वाळू माफियांविरोधात ग्रामस्थ संतप्त

बेल्हा : सातत्याने होणारा वाळू उपसा, तक्रारी करुनही महसुल विभागाने केलेले दुर्लक्ष यामुळे शेवटी वाळू माफियांना रोखण्यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन जुन्नर तालुक्यातील साकोरी येथील ओढ्यावरील अवैद्य वाळू उपसा थांबविला़ यावेळी झालेल्या बाचाबाचीत ग्रामस्थांनी वाळू उपसा करणाऱ्या गाड्यांवर दगडफेक करुन त्यांना पळवून लावले़ तसेच त्यांच्या दोन दुचाकीही पेटवून दिल्या. त्यानंतर महसुल विभाग खडबडुन जागा झाला व त्यांनी लिलावाच्या व्यतिरिक्त सरकारी ओढ्यातून सुमारे ५०० ब्रास वाळू संबंधित ठेकेदार व त्यांच्या सहका-यांनी चोरुन नेल्याची तक्रार आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
या बाबत मिळालेल्या माहिती अशी, साकोरी येथील पुलाच्या पलीकडील कुकडी नदी पात्रातील वाळुचे लिलाव झालेले आहेत. मात्र या बाजुलाच असणाऱ्या या सरकारी ओढ्यातूनही अवैद्यरित्या वाळु उपसा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी महसुल विभागाकडे केल्या. मात्र महसुल विभागाने याची दखल घेतल नाही़ त्यामुळे आज ग्रामस्थांचा उद्रेक झाला. ग्रामस्थ एकत्र आले व ते वाळू उपसा सुरु असलेल्या ओढ्यावर गेले़ त्यांनी वाळू चोरी रोखली.
यामुळे ग्रामस्थ व अनधिकृत वाळु उपसा करणाऱ्यांमध्ये प्रथम शाब्दीक चकमक सुरु झाली. या चकमकीचे रुपांतर हाणामारीत झाले़ ग्रामस्थांनी या वाळु माफियांना पळवून लावले़ त्यांच्या वाळु उपसा करणाऱ्या तसेच वाळु वाहतुक करणाऱ्या वाहनांची तोडफोड केली. या मध्ये काही दुचाकी व एक कार जाळण्याचा प्रयत्न झाला.
साकोरी येथील या प्रकाराची माहिती महसुल तसेच आळेफाटा पोलिसांना मिळाल्यानंतर ते तातडीने घटना स्थळी दाखल झाले. पोलीस निरिक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी जमावाला शांत करत ग्रामस्थांबरोबर बैठक घेतली. यामध्ये ग्रामस्थांनी या ओढ्यातुन अवैद्य रित्या होणा-या वाळु उपसा बाबत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. (वार्ताहर)

Web Title: The villagers are angry against sand mafia