सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त;भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 19:16 IST2025-07-11T19:16:16+5:302025-07-11T19:16:49+5:30
आरोपी हा गावठी कट्ट्यासह नारायणी धाम मंदिराजवळ संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांना मिळाली होती.

सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त;भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई
पुणे - शहरात गुन्हेगारीला आळा घालण्याच्या प्रयत्नात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची कारवाई करत सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त केले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निखिल सचिन यादव (वय २४, रा. धनकवडी, शेवटचा बस स्टॉप, जानुबाई मंदिराजवळ, 5 स्टार सोसायटी) असे अटक करण्यात आलेल्या या गुन्हेगाराची नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी निखिल यादव हा गावठी कट्ट्यासह नारायणी धाम मंदिराजवळ संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने धाव घेत सापळा रचून निखिलला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडे गावठी बनावटीचा एक कट्टा आढळून आला. त्यावरून पोलिसांनी शस्त्र जप्त करून आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. आरोपी हा पूर्वीही गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचा संशय असून त्याची पार्श्वभूमी तपासली जात आहे.