Vijay Shivtare : 'ही लढाई मला लढू द्या...'; विजय शिवतारेंनी महायुतीतील नेत्यांना केली विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 14:36 IST2024-03-24T14:36:42+5:302024-03-24T14:36:56+5:30
Vijay Shivtare : "मी १२ एप्रिल रोजी १२ वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांचे १२ वाजवणार आहे," अशी घोषणा शिवतारे यांनी केली आहे.

Vijay Shivtare : 'ही लढाई मला लढू द्या...'; विजय शिवतारेंनी महायुतीतील नेत्यांना केली विनंती
Vijay Shivtare ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. या मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे, तर दुसरीकडे महायुतीमधील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनीही लोकसभा लढवणार असल्याचे आज जाहीर केले, त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. "मी १२ एप्रिल रोजी १२ वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी केली असून महायुतीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी एक विनंतीही केली आहे.
विजय शिवतारेंनी घेतला फायनल निर्णय: १२ तारखेला फॉर्म भरणार, निवडणुकीचं सर्व प्लॅनिंग सांगितलं!
"माझ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे, आता माझ्याबाबतील ते कन्फुजन करत आहेत की, विजय शिवतारे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत. त्यांच्यावर महायुतीमधील नेत्यांमधून दबाव येईल, ते काहीतरी सेटलमेंट करतील. तुमच्या माध्यमातून मी महायुतीतील नेत्यांना विनंती करतो की, ही लढाई मला लढू द्या. ही धर्माची लढाई आहे. राजकारणाची स्वच्छता करायची असेल तर मला हे करावे लागेल, अशी विनंती विजय शिवतारे यांनी महायुतीतील नेत्यांना केली.
"एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल. यांनी ग्रामीण भागात दहशत पसरवला आहे. अनेकांना दुखावलं आहे. हा विंचू अनेकांना ढसला आहे, आता तो विंचू मोदी साहेबांजवळ जाऊन बसला आहे. आता दोन्ही शक्तींचा बिमोड करायला पाहिजे. निवडून आल्यानंतर विजय शिवतारे महाराष्ट्रासाठी फकिर म्हणून काम करेल, असंही शिवतारे म्हणाले.
१२ तारखेला फॉर्म भरणार
"मी १२ एप्रिल रोजी १२ वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांचे १२ वाजवणार आहे," अशी घोषणा शिवतारे यांनी केली आहे. मतदारसंघात मला प्रचंड प्रतिसाद मिळत असून माझा विजय होणारच, असा विश्वासही विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.
"माझ्या व्यासपीठावर कोणताही मोठा नेता उपस्थित राहणार नाही. माझ्यासोबत फक्त जनसामान्य दिसतील. माझी ओळखपत्रं गावा-गावात वाटली जातील. १ एप्रिल रोजी सभा झाल्यानंतर पाच विधानसभा मतदारसंघांत सभा घेतल्या जातील. या सभांमध्ये त्या त्या भागातील प्रश्न मांडले जातील,असंही शिवतारे म्हणाले.