दिग्गजांचा पत्ता कट, माजी नगरसेवक एकमेकांसमोर उभे; उमेदवार वाटप करताना पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 20:00 IST2025-11-11T20:00:00+5:302025-11-11T20:00:02+5:30
काहीं माजी नगरसेवकांना महापालिकेच्या सभागृहात जाण्याच्या ईच्छेवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे

दिग्गजांचा पत्ता कट, माजी नगरसेवक एकमेकांसमोर उभे; उमेदवार वाटप करताना पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार
पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर झाली. या सोडतीने ४१ प्रभागापैकी ३३ प्रभागामध्ये खुली जागा एकच आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे. तर काही प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने अनेकांना उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षातंर्गत संषर्घ करावा लागणार आहे. अनेक प्रभागामध्ये खुली जागा एकच असल्यामुळे दिग्गज माजी नगरसेवकांना एकमेकांसमोर उभे राहवे लागणार आहे. आरक्षण सोडतीमुळे कोणत्या प्रभागामध्ये कोण उभे राहणार याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. तर काहीं माजी नगरसेवकांना महापालिकेच्या सभागृहात जाण्याच्या ईच्छेवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आरक्षण सोडतीमुळे उमेदवारी वाटप करताना पक्षश्रेष्ठींची ही डोकेदुखी वाढणार आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी गणेश कला क्रिडा रंगमंच येथे प्रारूप आरक्षण सोडत आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत शाळेतील मुलांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त प्रसाद काटकर आदी उपस्थित होते. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव - कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे. १६५ नगरसेवकांच्या जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे ८३ नगरसेविका आणि ८२ नगरसेवक आहेत. अनुसूचित जातींसाठी (एससी) २२, तर अनुसूचित जमातींसाठी (एसटी) २ जागा आरक्षित आहेत. तसेच ओबीसींसाठी ४४ जागा राखीव आहेत. या आरक्षण सोडतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार आधी एसटी, एससी आणि त्यानंतर ओबीसीचे आरक्षण काढण्यात आले.
उमेदवारासाठी पक्षातंर्गतही करावा लागणार संषर्घ
काही प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक आहे. यामुळे अशा प्रभागांमध्ये अनेकांना उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षातंर्गत संषर्घ करावा लागणार आहे. तर काही जणांना पुन्हा महापालिकेच्या सभागृहात जाण्याच्या आपल्या इच्छेवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. उमेदवारी वाटप करताना पक्षश्रेष्ठींसाठी ही मोठी डोकेदुखी वाढणार आहे. यामध्ये नाराजी टाळण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये तीन जागा एससी, एसटी, ओबीसीसाठी राखीव झाले आहेत. १ड ही एकच जागा खुल्या वर्गासाठी आहे. त्यामुळे या प्रभागातील माजी नगरसेवक अनिल टिंगरे, रेखा टिंगरे आणि सतीश म्हस्के यांना एकमेकांच्या विरोधात निवडणुक लढवावी लागण्याची शक्यता आहे.
तीन माजी उपमहापौर अडचणीत
प्रभाग क्रमांक २ फुलेनगर नागपुर चाळ मध्ये अनुसुचित जातीचे महिला आरक्षण पडले आहे. त्यामुळे माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे अडचणीत आले आहेत. प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी आणि प्रभाग क्रमांक २७ नवीपेठ पर्वतीमध्ये अनुसूचित जातीचे महिला आरक्षण पडलेले नाही. त्यामुळे अनु्क्रमे माजी उपमहापौर सुनीता वाडेकर आणि माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा पत्ता कट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गेल्या पंचवार्षिकमधील तीन माजी उपमहापौर अडचणीत आले आहेत.
बागुल, बागवे, बिडकर अडचणीत
प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर -पदमावती मध्ये ओबीसी महिला आरक्षण पडले आहे. त्यामुळे माजी उपमहापौर आबा बागुल अडचणीत आले आहेत. प्रभाग क्रमांक २२ काशेवाडी -डायस प्लॅाटमध्ये अनुसुचित जातीचे महिला आरक्षण पडले आहे. त्यामुळेे माजी नगरसेवक अविनाश बागवे अडचणीत आले आहेत. प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती -कमला नेहरू हॉस्पिटल - केईएममध्ये ओबीसीचे महिला आरक्षण पडले आहे. त्यामुळे माजी सभागृहनेते गणेश बिडकर अडचणीत आले आहे. बागुल, बागवे, बिडकर यांना खुल्या जागेवरून निवडणुक लढवावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
३३ प्रभागात खुली जागा एक असल्यामुळे उमेदवारी देताना कस लागणार
पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागापैकी ३३ प्रभागामध्ये खुली जागा एकच आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी या प्रभागामध्ये अतंर्गत संघर्ष करावा करावा लागणार आहे. या प्रभागात उमेदवार वाटप करताना पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार आहे. प्रभाग क्रमांक ७ गोखलेनगर- वाकडेवाडी , प्रभाग क्रमांक १६ हडपसर - सातववाडी , प्रभाग क्रमांक १९ कोंढवा खुर्द -कौसरबाग , प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती -कमला नेहरू हॉस्पिटल - केईएम, प्रभाग क्रमांक २८ जनता वसाहत - हिंगणे खुर्द , प्रभाग क्रमांक ३३ शिवणे खडकवासला धायरीपार्ट, प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी -माणिकबाग , प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर -आंबेगाव -कात्रज मध्ये खुल्या जागा दोन आहेत. त्यामुळे या आठ प्रभागात खुल्या जागेतुन निवडणुक लढविणा०यांना संधी आहे.
हरकती आणि सूचना १७ नोव्हेंबर पासुन नोंदविता येणार
आरक्षणाचे प्रारूप १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. या प्रारूप आरक्षण सोडतीवर १७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहेत. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची अंतिम मुदत आहे. हरकती सूचना महापालिका मुख्यालय, निवडणूक कार्यालय किंवा पालिकेच्या प्रभाग कार्यालयात नोंदविता येणार आहेत. पालिकेची वेबसाइट, ई-मेल किंवा ऑनलाइन प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत. त्यानंतर २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.
पुणे महापालिका एकूण जागा १६५
अनुसूचित जमातींसाठी (एसटी) २ जागा - १ महिला राखीव
अनुसूचित जातींसाठी (एससी) २२ जागा- ११ महिला राखीव
ओबीसींसाठी ४४ जागा - २२ जागा महिला राखीव
सर्वसाधारण ९७ जागा - ४९ महिला राखीव