पुणे : तरुणाईमध्ये ‘बाइक रेसिंग’चे फॅड वाढत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना बाइक रेसिंगच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या रिल्स करण्यासाठी तरुणाईमध्ये बाइक रेसिंगचे प्रकार वाढले आहे.
मुंबईत अनेक भागांत बाइक रेसिंग होत असल्याचे दिसून आले होते. पुण्यातही बाइक रेसिंगचे प्रकार घडले होते. यामधून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून वारंवार कारवाई केली जाते. तसेच, गुन्हेदेखील दाखल केले जातात. पण तरीही काही ठिकाणी असे प्रकार घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे परिवहन विभागाने सर्व आरटीओंना बाइक रेसिंगच्या प्रकारांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आरटीओकडून पथकांची नेमणूक करून बाइक रेसिंग होणाऱ्या घटनांचा शोध घेतला जात आहे.
पुण्यात पूर्वी रात्रीच्या वेळी काही भागांत रेसिंग होत असे. आता असे प्रकार घडत असल्यास आरटीओची नजर राहणार आहे. तसेच वाहन जप्त करणे, परवाना निलंबन करणे, अशी कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली.