बारामतीत 'सायको' तरुणाच्या हल्यात जखमी झालेल्या भाजीविक्रेत्याचा अखेर मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 06:42 PM2021-11-17T18:42:14+5:302021-11-17T18:42:22+5:30

भाजी विक्रेत्याने पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाने डोक्यावर केला होता हल्ला

Vegetable seller killed in Baramati | बारामतीत 'सायको' तरुणाच्या हल्यात जखमी झालेल्या भाजीविक्रेत्याचा अखेर मृत्यू

बारामतीत 'सायको' तरुणाच्या हल्यात जखमी झालेल्या भाजीविक्रेत्याचा अखेर मृत्यू

googlenewsNext

बारामती : विक्षिप्त तरुणाच्या हल्यात जखमी झालेल्या भाजीविक्रेत्याचा बुधवारी(दि १७) उपचार सुरु असताना मृत्यु झाला. रविवारी(दि १४) हातगाडीवर भाजीविक्री करणारे फारुख इसाक तांबोळी (वय 52 ) यांच्यावर भाजी विक्री करताना अचानक अनिकेत सुरेश शिंदे (वय २२) या विक्षिप्त तरुणाने अ‍ॅडजस्टेबल पान्याने  हल्ला केला होता.यामध्ये तांबोळी गंभीर जखमी झाले होते.

तांबोळी यांच्याकडे  दारु प्यायला २० रुपये द्या, अशी मागणी शिंदे याने केली होती. मात्र, तो अनोळखी असल्याने त्याला पैसे देण्यास त्यांनी नकार दिला, त्या नंतर तो तेथून गेला पण काही क्षणातच तो  परत आला. काही कळण्याच्या आतच तांबोळी यांच्या डोक्यावर अ‍ॅडजेस्टबल पान्याने जोरदार प्रहार केला. काही क्षणात हा हल्ला झाल्यामुळे जमिनीवर कोसळले. तेथील लोकांनी अनिकेत यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याच्याविरुध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. फारुख यांच्यावर सुरवातीला बारामतीत आणि त्या नंतर पुण्यात उपचार करण्यात आले, मात्र छोट्या मेंदूला दुखापत झाल्याने आज पहाटे त्यांचा मृत्यु झाला.

तांबोळी यांच्या कुटुंंबांचा संपुर्ण उदरनिर्वाह पुर्णपणे भाजीव्यवसायावर अवलंबुन होता. तसेच घरात कोणीही कमावती व्यक्ती नाही. या घटनेमुळे तांबोळी यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. तांबोळी यांच्या पश्चात पत्नी व तीन मोठ्या मुली व एक सहा वर्षाचा मुलगा आहे

‘सायको’तरुणांची यादी करुन त्यांना शहराबाहेर काढा

तांबोळी यांच्यावर झालेला हल्ला लक्ष्मी नगर मधील महिला तरुण व नागरिकांच्या समोर झाला. त्यामुळे येथील नागरीक अत्यंत भयभीत व भावनिक झाले आहेत. निष्पाप नागरिकांच्या जीवाशी मनोरुग्ण खेळतात, यामध्ये कारण नसताना एखाद्याचा जीव जातो. त्याचे कुटुंंबिय उघड्यावर येतात. पोलिसांनी अशा ‘सायको’तरुणांची यादी करुन त्यांना शहराबाहेर काढावे,अशी मागणी मानवी हक्क कार्यकर्ता मुनीर तांबोळी यांनी केली आहे.

...बारामतीकरांनी उपचारासाठी केली होती मदत

मानवी हक्क कार्यकर्ते मुनीर तांबोळी यांनी भाजी विक्रेते तांबोळी यांच्यावरील उपचारासाठी बारामतीकरांना आवाहन केले होते. बारामतीकरांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आर्थिक मदत देखील केली. मात्र, तांबोळी यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Vegetable seller killed in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.