Vaishnavi Hagawane Death Case: हगवणेंचे जेसीबी मशीन ताब्यात घेणारा रिकव्हरी एजंट कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:49 IST2025-06-04T16:47:43+5:302025-06-04T16:49:08+5:30
आर्थिक फसवणूकप्रकरणी महाळुंगे पोलिसांकडून होणार चौकशी

Vaishnavi Hagawane Death Case: हगवणेंचे जेसीबी मशीन ताब्यात घेणारा रिकव्हरी एजंट कोण?
पिंपरी : जेसीबी मशीन व्यवहारातील आर्थिक फसवणूकप्रकरणी बँकेचा रिकव्हरी एजंट कोण होता, त्याने बँकेला माहिती देऊन कायदेशीर प्रक्रिया करून जेसीबी मशीन ताब्यात घेतले होते का, याचा तपास करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित एजंटकडे महाळुंगे एमआयडीसी पोलिस चौकशी करणार आहेत.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अडकलेला तिचा पती शशांक आणि सासू लता हगवणे यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यावेळी हा जेसीबी खरेदीचा व्यवहार नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. मात्र, पोलिसांनी शशांकचा जबाब सादर करून पोलिस कोठडीची मागणी केली. रिकव्हरी एजंटने अनधिकृतपणे जेसीबी मशीन ताब्यात घेतल्याचे निष्पन्न झाल्यास त्यालाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित रिकव्हरी एजंटचा पोलिसांकडून शोध सुरू झाला आहे.
पोलिसांनी न्यायालयात मांडलेली भूमिका
- जेसीबी मशीन खरेदीचा व्यवहार नोंदणीकृत करण्याऐवजी त्याची ‘नोटरी’ केली. त्यामुळे हा व्यवहार अधिकृत आहे किंवा नाही याचा तपास करायचा आहे.
- प्रशांत येळवंडे यांच्याकडून घेतलेल्या पैशांचे शशांक आणि लता हगवणे यांनी केले, ते पैसे कुठे गेले याबाबतही तपास करायचा आहे.
- येळवंडे यांच्या ताब्यात असलेले जेसीबी मशीन अनधिकृतपणे ताब्यात घेतल्याची शंका आहे. याबाबत संबंधित बँकेला माहिती नसल्याचीही शक्यता आहे. त्यामुळे संबंधित रिकव्हरी एजंट कोण आहे याबाबतही शशांक आणि लता हगवणे यांच्याकडे चौकशी करायची आहे.
जेसीबी मशीनचा व्यवहार फक्त भाडेतत्त्वावर झाला असल्याचा युक्तिवाद खेड न्यायालयात हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी केला. त्यामुळे ही आर्थिक फसवणूक म्हणता येणार नाही, असे ते म्हणाले. यावर महाळुंगे पोलिसांनी शशांकचा जबाब न्यायालयाकडे सादर केला. मे २०२४ मध्ये हा जबाब नोंदवण्यात आला होता. जेसीबी खरेदीचा आर्थिक व्यवहार झाल्याचे शशांकने दिलेल्या जबाबात नमूद आहे.