वैष्णवी हगवणे प्रकरण : नीलेश चव्हाणला नेपाळमध्ये पळून जाण्यासाठी कोणी मदत केली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 15:03 IST2025-06-01T15:02:49+5:302025-06-01T15:03:23+5:30

न्यायालयात सरकार पक्षातर्फे युक्तिवाद : बचाव पक्षाने फेटाळले आरोप

Vaishnavi Hagawane Death Case Vaishnavi Hagavane case: Who helped Nilesh Chavan escape to Nepal | वैष्णवी हगवणे प्रकरण : नीलेश चव्हाणला नेपाळमध्ये पळून जाण्यासाठी कोणी मदत केली ?

वैष्णवी हगवणे प्रकरण : नीलेश चव्हाणला नेपाळमध्ये पळून जाण्यासाठी कोणी मदत केली ?

पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नीलेश चव्हाणला नेपाळमध्ये पळून जाण्यासाठी कोणी मदत केली, वैष्णवीच्या मुलाचे पालकत्व नसताना बालकाला अनाधिकाराने कोणत्या कारणासाठी नीलेशने स्वत:कडे ठेवले, याची चौकशी करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे शनिवारी न्यायालयात करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नीलेशला शुक्रवारी अटक केली. बावधन पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले. नीलेश आणि हगवणे कुटुंबातील संबंध काय आहेत, वैष्णवीचा छळ करण्यात कोणाची भूमिका काय आहे, याची चौकशी करायची आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

पोलिसांच्या तपासात येणारे मुद्दे

- नीलेश चव्हाणकडे शस्त्र परवाना असून, त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलाचा वापर त्याने धमकावण्यासाठी केल्याची शक्यता आहे. तो वैष्णवीची नणंद करिश्माचा जवळचा मित्र आहे. त्याने इतरांच्या मदतीने कट रचून चिथावणी दिली. शशांक, सुशील आणि राजेंद्र हगवणे यांच्यासोबत त्याचे आर्थिक संबंध आहेत का?

- वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे यांचे मोबाइल नीलेशकडे होते. गुन्हा घडल्यानंतर तो नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली, कोणत्या मार्गाने तो तिथपर्यंत पोहोचला?

- वैष्णवीच्या मुलाचे पालकत्व नसताना बालकाला कोणत्या कारणासाठी त्याने ताब्यात ठेवले होते? या गुन्ह्यातील आरोपी आणि नीलेशमध्ये मोबाइलवरून काय संभाषण आणि चॅटिंग झाले?

- हुंडा म्हणून रोख रकमेसह इतर वस्तू घेण्यात आल्या आहेत. त्या कोठे ठेवल्या आहेत? 
 

बचाव पक्ष म्हणतो, तपास यंत्रणांची भूमिका बिनबुडाची

- बचाव पक्षातर्फे वकील स्वानंद गोविंदवार यांनी बाजू मांडली. नीलेश चव्हाण हा हगवणे कुटंबियांचा नातेवाईक नसल्याने त्याला या गुन्ह्यात अटक करणे बेकायदेशीर आहे. त्याच्याकडे आरोपींचे मोबाइल असू शकतात, ही तपास यंत्रणांची बिनबुडाची भूमिका आहे. नीलेशवर दाखल गुन्ह्यात तो पोलिसांना सहकार्य करत असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.

Web Title: Vaishnavi Hagawane Death Case Vaishnavi Hagavane case: Who helped Nilesh Chavan escape to Nepal