सुपेकरांच्या अडचणीत वाढ; नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:54 IST2025-05-29T16:51:14+5:302025-05-29T16:54:36+5:30

ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्रालय काय निर्णय घेणार? सुपेकरांची चौकशी होणार का? अशी चर्चा रंगल्या होत्या.

Vaishnavi Hagawane Death Case Jalindar Supekar gets a slap from the Home Department; Removed from the post of Deputy Inspector General of Prisons of Nashik, Sambhajinagar, Nagpur | सुपेकरांच्या अडचणीत वाढ; नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला

सुपेकरांच्या अडचणीत वाढ; नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला

पिंपरी :पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी कस्पटे-हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात मामे-सासरे  विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह सेवा सुधार विभाग, महाराष्ट्र) जालिंदर सुपेकर यांनी हगवणे कुटुंबास मदत केल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आला. तर या घटनेच्या निमित्ताने सुपेकर यांचा आणखी एक कारनामा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उघड केला आहे. त्यांनी माध्यमांसमोर सादर केलेली ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्रालय काय निर्णय घेणार? सुपेकरांची चौकशी होणार का?  अशा चर्चा रंगल्या होत्या. अशात आज गृहविभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढण्यात आला आहे.

दरम्यान, सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आपलं आयुष्य संपवले. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासरा, नणंद आणि सासू यांना अटक केली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी केली आहे. या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकर यांच्याबाबत गंभीर आरोप करण्यात आले.

त्यावर ‘आत्महत्येशी आणि पिस्तूल परवाना देण्यासंदर्भात माझा कोणताही संबंध नाही’, असे सुपेकर यांनी माध्यमांना सांगितले होते. त्यानंतर दमानिया यांनी पत्रकार परिषदेत ‘कारागृह साहित्य खरेदी प्रकरणातून नाव वगळावे,’ या संदर्भातील क्लिप ऐकविली. ‘याची सत्यता मी तपासली नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ती पाठविली होती. त्यांनी तपासून कारवाई करावी’, अशी मागणी दमानिया यांनी केली होती. यानंतर आज जालिंदर सुपेकर यांच्यावर गृहविभागाने कारवाई केली आहे.
 
तर या सर्व आरोपांवर डॉ. जालिंदर सुपेकर यांनी माध्यमांशी बोलतांना आपली बाजू मांडली होती. माझे कोणात्यातरी अज्ञात व्यक्तीबरोबर संभाषण असलेली ऑडिओ क्लिप काही माध्यमातून प्रसारित केली जात आहे. याबाबत माझे म्हणणे आहे की, संबंधित ऑडिओ क्लिपही बनावट असून, आमची बदनामी करण्याच्या दृष्टीने हेतुपूर्वक प्रसारित केली जात आहे. त्यामुळे  अशा छेडछाड केलेल्या ऑडिओ क्लिपद्वारे माझी बदनामी करणाऱ्या  संबंधिताविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

Web Title: Vaishnavi Hagawane Death Case Jalindar Supekar gets a slap from the Home Department; Removed from the post of Deputy Inspector General of Prisons of Nashik, Sambhajinagar, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.